Advertisement

 एसटी बसमधूनच कोरोनाचा संसर्ग होतो का ?          

प्रजापत्र | Sunday, 04/04/2021
बातमी शेअर करा

बीड दि.३ (प्रतिनिधी)-कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ४ एप्रिलपर्यंत जिल्हा लॉकडाऊन केला.दुपारी १ नंतर संचारबंदी असताना बीड शहरातून ट्रॅव्हल्सची वाहतूक सर्रासपणे सुरु आहे.मात्र एसटी बसवर निर्बंध लादण्यात आल्याने कोरोनाचा संसर्ग फक्त एसटी बसमधूनच होतो का? असा सवाल प्रवासी वर्गातून उपस्थित केला जाऊ लागला आहे.महत्वाचे म्हणजे सध्या ट्रॅव्हल्स मालकांकडून दुप्पट भाडे आकारण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

 

                       सध्या बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने एसटी बस बंद आहे.त्यामुळे पुणे,मुंबई,औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.विशेष म्हणजे एसटी बंद असल्याने खाजगी वाहतूकदारांनी तिकिटाच्या दरात दुप्पट वाढ केली.सध्या पुण्याला प्रवास करण्यासाठी ७०० रुपये,मुंबईसाठी १ हजार रुपये तर औरंगाबादसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून एसटी बस सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 
सर्वसामान्यांना परवडेना भाडे
एसटी बसद्वारे बीडमधून पुण्यासाठी प्रवास करायचा झाला तर ३३० रुपये तिकीट आकारण्यात येते.यासोबत मुंबईसाठी ५३० रु (दिवसा) तर रात्री (६२५) रुपये तिकीट असून औरंगाबादसाठी १७० रुपये शुल्क आहे.मात्र सध्या लालपरी बंद असल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांकडून पुण्यासाठी ७०० रुपये,मुंबईसाठी १ हजार रुपये तर औरंगाबादसाठी ५०० रुपये तिकीट आकारण्यात येत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना हे भाडे परवडत नसल्याचे चित्र आहे.

Advertisement

Advertisement