बीड : कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर कोरोना तपासणीची प्रयोग शाळा बीड येथे सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव मागील वर्षीच्या जुलै महिन्यात आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला होता, मात्र अद्यापही याला मंजुरी मिळालेली नसून या प्रस्तावावर केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत .
राज्यात कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर पहिल्या उद्रेकावेळीच प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी प्रयोगशाळा वाढविण्याचे निर्देश देण्यात आले होते. सुरवातीच्या काळात बीडमधील नमुने औरंगाबाद आणि लातूर येथे तपासणीसाठी पाठविले जात होते. त्यानंतर अंबाजोगाईच्या 'स्वाराती' वैद्यकीय महाविद्यालयात ही तपासणी सुरु झाली . त्यानंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयातही तपासणीची प्रयोगशाळा सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी जुलै २०२० मध्ये आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याला ८ महिने उलटून गेले आहेत, मात्र अजूनही आरोग्य विभागातील अधिकारी कागदी घोडेच नाचवित आहेत.
८ महिन्यानंतर आरोग्य विभागाच्या यावर सचिवांनी आता या प्रस्तावाबाबत नेमका किती निधी लागफेल, तो कोठून उपलब्ध करणार , तज्ञ मनुष्यबळ कोठून मिळणार ? अशा प्रश्नांचा भडीमार करणारे पत्र जिल्हा प्रशासनाला पाठविले आहे .
आयुक्त नुसतेच बोलून गेले
काही दिवसापूर्वी औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड जिल्ह्याला भेट दिली होती. त्यावेळी बीडमधील कोरोना तपासणी प्रयोगशाळा तातडीने सुरु करा असे आदेश त्यांनी दिले होते. त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव देखील त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला . मात्र सरकारकडे जुलै महिन्यापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे याची माहिती ना कोणी आयुक्तांना दिली, ना आयुक्तांनी विचारली. त्यामुळे विभागीय आयुक्तांचे आदेश देखील 'बोलाचाच भात ' ठरले आहेत. सुनील केंद्रेकर यांची कार्यक्षमता साऱ्या जिल्ह्याने पाहिलेली , अनुभवलेली आहे, त्यामुळे आता या विषयात त्यांनीच आरोग्य विभागातील वरिष्ठांचे कान टोचले तर काही होऊ शकते .