बीड : जिल्हा प्रशासानाने व्यापार्यांना विश्वासात न घेता लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने व्यापार्यांनी अँटीजेन तपासण्याही करुन घेतल्या त्यानंतरही जिल्ह्यात दहा दिवसाचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय व्यापार्यांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत जिल्हाभरातील व्यापारी महासंघाने लॉकडाऊनच्या काळात शिथिल केलेल्या वेळेतही दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून सकाळी 7 ते 9 ही शिथिलतेची दिलेली वेळ ग्राहक आणि व्यापारी कोणाच्याच सोयीची नाही. मुळात लॉकडाऊनचा निर्णयच सर्वांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे व्यापारी या वेळेतही आपली दुकाने उघडी ठेवणार नाहीत असे व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे. या निवेदनावर व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे, मनमोहन कलंत्री, अशोक शेटे, जवाहर कांकरीया, राजेंद्र मुनोत, प्रकाश कानगावकर, भास्कर गायकवाड, मंगेश लोळगे, सुर्यकांत महाजन आदींसोबतच सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या स्वाक्षर्या आहेत.
बातमी शेअर करा