माजलगाव-येथील रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू असून शुक्रवारी या दलालांनी बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करावी यासाठी येथील रजिस्ट्रारवर दबाव टाकला. एवढ्यावरच न थांबता दलालाने रजिस्ट्रारला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
येथील रजिस्ट्री कार्यालयाला दलालांनी चांगलेच वेढले आहे. हे दलाल बोगस कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून रजिस्ट्री करून घेत असल्याचे अनेक प्रकार सर्रास होत असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक दलाल एका जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी आला. रजिस्ट्रार पी.एम.राठोड त्याने दिलेली कागदपत्रे तपासू लागले. यावेळी राठोड यांना कागदपत्रामध्ये ही जागा बागायतीमध्ये येत असतांना ही रजिस्ट्री जिरायतीत दाखवण्यात आली असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी बागायती क्षेत्राची जिरायती म्हणून रजिस्ट्री होऊ शकणार नाही असे सांगितले. यामुळे दलाल व रजिस्ट्रारमध्ये वाद होऊन प्रकरण मारामारीपर्यंत गेले. काही वेळाने पोलीस रजिस्ट्री कार्यालयात आले. त्यांच्या समोरही हा वाद सुरूच होता. कार्यालयात जवळपास दोन तास सुरू असलेल्या या वादामुळे रजिस्ट्रीसाठी आलेल्या अनेकांना ताटकळत बसावे लागले. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
आर्थिक व्यवहारातून झाला वाद
बागायती क्षेत्र असतांनाही बोगस कागदपत्रे तयार करून शासनाला लाखोंचा चुन्ना लावला जात आहे. शुक्रवारी रजिस्ट्रार व दलालात आर्थिक व्यवहार पूर्ण झाला नाही. यातून रजिस्ट्रार यांनी अनेक त्रुटी काढल्या. यामुळे हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे सांगत होते.
रजिस्ट्रारची तक्रार नाही
कार्यालयात मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असताना ही रजिस्ट्रारने गुन्हा दाखल का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे . आपण त्या लोकांची तक्रार दिल्यास आपलेच कारमाने उघड होतील या भितीने रजिस्टार पी.एम.राठोड यांनी तक्रार दिली नसल्याची चर्चा असून अनेक जण चुकीचे कागदपत्रे आणून बागायती क्षेत्र असतांना जिरायती क्षेत्र दाखवत रजिस्ट्री करण्यासाठी दबाव टाकतात. यातून हा प्रकार घडला. मला कसल्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.