Advertisement

भुकेने मरण्याऐवजी लोक कोरोनाने मरणे पसंत करतील

प्रजापत्र | Wednesday, 22/07/2020
बातमी शेअर करा

आज लोकांसमोर त्यांच्या जगण्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. रोजगाराचा प्रश्‍न गंभीर होत आहे. कोरोना व्यापक प्रमाणात फैलावला तर तितकी आरोग्य यंत्रणा सक्षम नाही हे मान्य असले तरी रोजगाराचाच प्रश्‍न निर्माण झाला तर उद्या भुकेने मरण्याऐवजी लोक कोरोनाने मरणे पसंत करतील आणि तशी परिस्थिती या व्यवस्थेने येवू देवू नये या शब्दात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या मुलाखतीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 
https://youtu.be/1iuiEdQQQxc

प्रश्‍न-कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झालाय, कष्टकर्‍यांच्या आयुष्यात काय बदल घडलेत?
राजकुमार घायाळ
-समाजातील सर्वच घटकांवर परिणाम झाला हे खरे असले तरी काही घटक आहेत ज्यांना या काळात अजिबातच रोजगार मिळाला नाही. असंघटित क्षेत्रातील मोलकरणी असतील, एसटी हमाल, बांधकाम कामगार, मच्छीमार, रिक्षाचालक, हातगाडीवर व्यवसाय करणारे हॉकर्स, गटई कामगार, भंगार वेचणारे असे जे लोक आहेत त्यांचा रोजगारच बंद पडला. असंघटित क्षेत्रात येणार्‍या 122 पैकी 100 हून अधिक प्रकारच्या कामगारांचा रोजगार बुडाला. त्यांच्यासमोर केवळ आर्थिकच नाही तर कौटुंबिक प्रश्‍न सुध्दा निर्माण झालेत.
प्रश्‍न-कौटुंबिक प्रश्‍न कसे?
राजकुमार घायाळ-
हा जो वर्ग असतो त्याच्यापर्यंत अजूनही विचार पोहोचलेले नाहीत. या वर्गाला बचतीची ना सवय आहे, ना त्या वर्गाची ती पात्रता आहे. त्यामुळे यांच्याकडे शिल्लक काहीच नसते. यातूनच मग चार महिने घरात बसण्याची वेळ आल्यानंतर खायचे काय आणि कुटुंब चालवायचे कसे हा प्रश्‍न निर्माण झालाय आणि त्यातूनच अनेक नवे प्रश्‍न उद्भवले.
प्रश्‍न-ही पात्रता का निर्माण होत नाही?
राजकुमार घायाळ-
ज्या ठिकाणी अशी काही व्यवस्था आली त्या ठिकाणी लोकांना बचतीची सवय लागली. उदाहरणार्थ हमालांना प्रॉव्हीडंट फंड, ग्रॅच्यूएटी आदीची तरतूद करण्यात आली आहे पण त्या माथाडी कायद्याचे देखील 25% अंमलबजावणी होते. ज्या विभागाने याची अंमलबजावणी करायची तो कामगार विभागच कमकूवत आहे. या विभागातील 55% पदे रिक्त आहेत. ज्यांना श्रमाची चोरी करायची त्या वर्गाला हा विभागच नकोय आणि सध्या व्यवस्थेत अशा वर्गाचच प्रतिनिधित्व जास्त आहे त्यामुळे कामगार विभागाची अवस्था शेळीच्या शेपटीसारखी झाली आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत कामगारांना कोणी वाली राहत नाही.
प्रश्‍न-या काळात श्रमच लॉकडाऊन झाल्यासारखं चित्र निर्माण झालंय त्याला पर्याय काय?
राजकुमार घायाळ-
परिस्थिती खरोखर गंभीर आहे. आजच्या तारखेत भूकमरीने मरायचे की कोरोनाने असा विचार करण्याची वेळ कामगारांवर आली आहे. कोरोनाने मरणारांची संख्या मर्यादित आहे पण असेच चित्र राहिले तर भूकेने मरणारांची संख्या वाढेल. कोरोनाचा व्यापक फैलाव झाला तर आरोग्याची यंत्रणा तितकी सज्ज नाही हे मान्य असले तरी कष्टकर्‍यांना ज्या अडचणी येत आहेत त्यावर विचार झाला पाहिजे. उद्या कष्टकरी भूकेने मरण्याऐवजी कोरोनाने मरणे पसंत करील आणि अस्वस्थ होवून लोक रस्त्यावर येतील.ही परिस्थिती व्यवस्थेने येवू देवे नये. कष्टकर्‍यांना कामाची मुभा दिली पाहिजे.
प्रश्‍न-हे खरे असले तरी सामान्यांच्या समस्या विचारात घ्यायच्याच नाहीत. सरकार आणि प्रशासनाला काय वाटते ते जनतेवर लादायचे अशी एक व्यवस्था येवू पहात आहे का?
राजकुमार घायाळ-
येवू पहात आहे का नव्हे तर आली आहे. सगळ्याच प्रश्‍नांची उत्तरे एकाच व्यक्तीला कधीच माहीत नसतात. आपला देश एवढा मोठा आहे. त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे. त्यातून प्रश्‍नांचे, समस्यांचे वेगवेगळे कांगोरे असतात. लोकशाहीत अनेक बाजूचे विचार ऐकून निर्णय घ्यायचे असतात. मात्र देशात एकाने निर्णय घ्यायचा आणि इतरांनी माना डोलवायच्या अशी परिस्थिती निर्माण होतेय हे बदलावे लागेल. हे चित्र धोकादायक आहे.
प्रश्‍न-या लॉकडाऊनच्या काळात सरकारी यंत्रणा कष्टकर्‍यांच्या मदतीला आलेली दिसली का?
राजकुमार घायाळ-
मदतीचं सोडा मूळ सांगायचं कोणाला हाच प्रश्‍न आहे. मंत्रालयात एक अधिकारी आणि एक कर्मचारी. त्यांना काही सांगायला गेलं तर लॉकडाऊनचं कारण सांगतात. मग बोलायचं कोणाला? सरकार कसं चाललंय हेच कळत नाही. दिल्ली काय , राज्यसरकार काय, किंवा गावपातळीवर काय सर्वत्र हेच चित्र आहे.
प्रश्‍न-पण सरकारने कष्टकर्‍यांना रेशनच्या माध्यमातून मदत केली होती ना?
राजकुमार घायाळ-
रेशनच्या माध्यमातून मदत झाली. नाही असं नाही. पण मला सांगा नुसतं तांदूळ आणि ज्वारीने गरजा भागतात का? प्रत्येकाला इतरही गरजा असतात. भाजीपाला, मीठमिरची, आजारपण यासाठी पैसा लागतो. आजारपणाचं तर वेगळंच झालय आजच्या घडीला कोरोना हा एकमेव आजार असून इतर सर्व आजार गायब झाल्याचं चित्र निर्माण केलं जातयं.खाजगी दवाखाने बंदच आहेत. त्यांच्यावर कारवाईची तलवार आहे. पण बोलायचं कोणाला.
प्रश्‍न-या क्षेत्रापुढची आव्हानं नेमकी काय असतील?
राजकुमार घायाळ-
अनेक विषय आहेत. आजच्या तारखेला ज्याला आपण नफाखोरीची यंत्रणा मानतो. ती हायर अ‍ॅण्ड फायरची यंत्रणा पूर्वी खाजगी मध्ये असायची ती आता सरकारी मध्ये  देखील येतेय हे घातक आहे. रोज नवे नवे कायदे आणले जातायत आणण्याचा प्रयत्न होतोय. कामगार कायद्यांना मूठमाती देण्याचा प्रकार सुरू आहे. एक साधं उदाहरण सांगतो. या काळात हमालांना अनेक ठिकाणी काम मिळालं. मजूरी मिळाली पण पंतप्रधान योजनेच्या धान्याची चढउतार करण्याचं काम ज्या हमालांनी केलं त्यांना एप्रिलपासून मजूरी मिळालेली नाही. मग त्यांनी फुकट काम करायचं का? असे अनेक प्रश्‍न आहेत.
प्रश्‍न-आपण नव्या कायद्याबद्दल बोलताय. बाजार समितीतही बदल होतोय?
राजकुमार घायाळ-
देशात एक देश एक बाजार अशी घोषणा केली गेली. हे ऐकायला चांगलं आहे. पण प्रत्यक्षात शक्य आहे का? शेतकर्‍याच्या शेतातून थेट ग्राहकाच्या दारात असं बोललं जातं पण ते कसं होणार आहे. शंभर क्विंटल धान्य शेतकरी माप तराजू घेऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन विकणार आहे का? यासाठी एक विश्‍वासू व्यवस्था असावी लागते.
प्रश्‍न-मध्यंतरी शेतकरी गटानी फळे आणि भाजीपाला विकण्याचा प्रयोग केला होता?
राजकुमार घायाळ
-झाला असेल पण या गटांनी खरेदी किती केली. मोठ्या शहरांमध्ये या गटांना विक्री करता येत नव्हती त्यामुळे छोट्या शहरात लागतो तितकाच माल या लोकांनी खरेदी केला आणि शेतकर्‍यांना तो माल बांधावर फेकावा लागला. कोरोनच्या पूर्वी जी मोसंबी शेतकर्‍यांना किलो मागे 40-50 रूपये देत होती त्या मोसंबीला कोरोनाच्या काळात 20 रूपये भाव आला मग हे काय होणार.
प्रश्‍न-मग एक देश एक बाजारचं भवितव्य काय वाटतं?
राजकुमार घायाळ-
ही एक लबाड कल्पना आहे. महाराष्ट्रात सुरूवातीला पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आम्ही या विषयावर अभ्यास करू असं जाहीर केलं होतं. पण त्यासोबतच आता प्रशासनाने वेगळे आदेश काढले आहेत. प्रशासन आणि शासन यांची नाळ जोडलेली नाही हेच यातून दिसत आहे. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं सूत्र सरकारला जमलय असं अजूनतरी वाटत नाही ते जमवावं लागणार आहे.
प्रश्‍न-सरकारने काय केलं किंवा नाही हा वेगळा विषय. संघटना म्हणून कोरोनाच्या काळात कष्टकर्‍यांसाठी आपण काय केलं?
राजकुमार घायाळ-
आम्ही अनेक क्षेत्रात मदत केली. बाजारपेठेमध्ये काही लोकांना कोरोनाची लागण होवून मृत्यू झाले पण हमाल हे अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने त्यांची दखल घेतली जात नव्हती. आम्ही या संदर्भात शरद पवारांसोबत बैठक घेतली. त्यातून आता या हमालांना अत्यावश्यक सेवेत गृहीत धरून मदत देण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट कामगारांना पतपेढीच्या माध्यमातून अनामत स्वरूपात मदत करता आली असं काही तरी सुरू आहे.
प्रश्‍न-आपण अनेक वर्ष या चळवळीत आहात, कोणत्याही संकटात कष्टकरी वर्ग लवकर कोसळतो यामागचं कारण काय?
राजकुमार घायाळ-
मूळ विषय आहे ते या वर्गाची पत निर्माण करणं. ती पत निर्माण करणारी यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात 1969 ला यशवंत चव्हाणांच्या माध्यमातून माथाडी कायदा आला. तो परिपूर्ण आहे असे नाही. पण त्याची सुरूवात झाली. त्यामुळे आज किमान हमालांना एक प्रकारची पत निर्माण होतेय. त्यांना पगार, बोनस याची खात्री आहे. अशी पत निर्माण करणार्‍या व्यवस्थेसाठी आम्ही झटतोय. 2008 ला मनमोहनसिंग यांचे सरकार केंद्रात असताना सामाजिक सुरक्षा कायद्यासाठी पुढाकार झाला असे काही प्रयोग होतायत. पण कल्याणकारी मंडळापुढं सरकार काही विचार करत नाही. कल्याणकारी सोबतच रोजगाराचं, मजूरीचं नियमन करणारी मंडळं हवी असतात पण ती नसल्यानं अडचणी निर्माण होतात. या काळात ऊसतोड कामगारांच्या बाबतीत ते पहायला मिळतंय.
प्रश्‍न-ऊसतोड कामगारांसाठी तर महामंडळ आहे ना?
राजकुमार घायाळ-
आहे पण ते कल्याणकारी आहे. माथाडी मंडळासारखं नाही. ऊसतोड कामगारांच्या क्षेत्रात अनेक मोठे लोक काम करतात पण ऊसतोड कामगारांसाठी अजूनही फार काही करता आलेलं नाही. मंडळं कल्याणकारी असतील तर ऐच्छीक असतात आणि या वर्गाला न्याय द्यायचा तर कायदे आणि योजना सक्तीच्या असाव्या लागतात. त्या लोकांच्याच सहभागातून राबवायच्या असल्या तरी त्या ऐच्छीक ठेवून भागत नाही.
प्रश्‍न-मग नेमकं काय अपेक्षित आहे?
राजकुमार घायाळ-
कष्टकर्‍यांच्या रोजगाराचं, मजूरीचं नियमन करणारी मंडळं असावीत. पूर्वी जशी पॉप्यूलर मंडळं होती त्यात कामगार, सरकार आणि उद्योजकांचे प्रतिनिधी असायचे तशी मंडळं झाली पाहिजेत. कामगारांना पत निर्माण होईल अशी व्यवस्था असली पाहिजे. कामगारांना पत देण्यासाठी धोरणं बदलावी लागतील, व्यवस्था बदलावी लागेल. ज्यांना कामगारांचे श्रम चोरून नफा मिळवायचा असतो त्यांचं किती ऐकायचं हे सरकारने ठरवावं लागेल. महाराष्ट्रात शरद पवारांसारख्या चांगली दृष्टी असणार्‍या व्यक्तीच्या विचारातलं सरकार आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रात जास्त अपेक्षेने पाहतोय.
प्रश्‍न-हे सारं होत राहील पण आता कोरोनासह जगण्यासाठी कष्टकर्‍यांनी काय केलं पाहिजे?
राजकुमार घायाळ-
सर्वात अगोदर कोरोना म्हणजे खूप काही भयंकर आणि गंभीर आहे हे डोक्यातून काढून टाका. आपण व्यवस्थित काळजी घेतली, सुरक्षेचे नियम पाळले तर कोरोना होत नाही आणि झालाच तरी त्यावर उपचार आहेत. लस नसली तरी वेगवेगळे औषधांनी कोरोनापासून लोक बरे होत आहेत. आजच्या तारखेला काळजी हाच उपचार आहे हे खरे आहे. मात्र पुरेशी काळजी घेवून प्रत्येकाने स्वत:ला कामात गुंतविणे गरजेचे आहे आणि असंही कष्टकर्‍यांची प्रतिकारशक्ती जास्त चांगली असते. या वर्गात विषाणूंचा सामना करण्याची जन्मत: शक्ती असते त्यामुळे आता विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी पुनश्‍च: हरिओम करावा लागेल. 
 

Advertisement

Advertisement