बीड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांसाठी २० मार्च रोजी मतदान होत आहे. १९ पैकी केवळ ८ जागांसाठी मतदान होत असून ११ जागा रिक्त राहणार असल्याने नव्याने निवडून आलेल्या व्यक्तींना कारभार पाहायला मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे. मात्र राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या संस्थेत ताकत दाखविण्यासाठी ३ पॅनल आणि अनेक अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी प्रथमच राष्ट्रवादी आणि भाजप गटासोबतच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने देखील वेगळी चूल मांडत ८ पैकी ६ जागांवर उमेदवार दिले आहेत , तर राष्ट्रवादीला देखील ८ पैकी ६ जागांवरच उमेदवार देता आले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक तिरंगी होणार आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीचे पॅनलसाठीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकीला 'नुरा कुस्तीचे ' स्वरूप आलेले असले आणि नव्या कारभाऱ्यांना कारभार पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी असली तरी निवडणूक बहुरंगी होणार असेच चित्र आहे. जिल्हा बँकेत आतापर्यंत महायुतीचा फॉर्म्युला वापरला जायचा, यावेळी मात्र यात बदल झाला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस , भाजप आणि शिवसेना असे तीन पॅनल असल्याचे चित्र आहे तर भाजकडून अनेक ठिकाणी बंडखोरी आहे.
तीन पॅनल आणि पुन्हा बंडखोर यामुळे अनेक मतदारसंघात निकालाचे चित्र नेमके काय असेल याचा अंदाज बांधणे आजतरी अवघड झाले आहे. अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतात , किंवा ते लागावेत यासाठी देखील प्रमुख नेते व्यूहरचना करताना दिसत आहेत .
सोळंकेंचा अट्टाहास राष्ट्रवादीच्या अडचणींचा
या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित आहेत , नागरी बँका आणि पतसंस्था मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अर्ज भरला होता . त्यांनी अर्ज भरण्यास पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे देखील समर्थन होते , मात्र ऐनवेळी माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांनी मोदींच्या नावाला विरोध करीत गंगाधर आगे यांच्या नावाचा अट्टाहास केला. त्यांच्या अट्टाहासामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये गंगाधर आगे यांचे नाव घुसडण्यात आले. हा मतदारसंघ परंपरागतरित्या भाजप गटाचा मानला जातो, येथून सुभाष सारडा आणि आदित्य सारडा निवडून येत आलेले होते, मात्र यावेळी सारडा कुटुंबातील कोणीच निवडणुकीत नाही, अशावेळी आ. सोळंकेंनी या मतदारसंघासाठी केलेला अट्टाहास राष्ट्रवादीसाठी अडचणींचा ठरू शकतो.