Advertisement

राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

प्रजापत्र | Monday, 15/03/2021
बातमी शेअर करा

मुंबई: अँटिलिया स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे  यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्येही काही प्रमाणात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तासांच्या या भेटीत नेमकं काय घडलं हे कळू शकलं नाही. मात्र, अनेक प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. 

मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला होता. त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचा तपास 'एनआयए'नं हाती घेतला आणि त्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. आता त्यांची कसून चौकशी सुरू असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. मात्र, वाझे यांची अटक ही महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे. विरोधक हे सचिन वाझे यांच्या शिवसेनेशी असलेल्या संबंधांकडं बोट दाखवत आहेत. त्यामुळं शिवसेनेचीही गोची झाली आहे. निलंबित असलेल्या वाझे यांनी पोलीस सेवेत घेतलेच कसे, असा प्रश्न केला जात आहे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा यावर पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं.

आघाडीत ठिणगी?

वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचंही बोललं जात आहे. मनसुख हिरन प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांनी वाझे यांना पाठीशी घातल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केल्याचं समजतं. तर, शिवसेनेकडून अनिल देशमुख  यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. त्यांना हे संपूर्ण प्रकरण नीट हाताळता आलं नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, असा मतप्रवाह शिवसेनेत असल्याचं समजतं.

Advertisement

Advertisement