उस्मानाबाद दि.१३ - जिल्ह्यातील कळंब येथे औषध प्रशासनाने अचानक केलेल्या तपासणीत बनावट व अप्रमाणित औषधे आढळली आहेत. शहरातील नामांकित डॉक्टरांच्या दुकानातून मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्हा औषध निरीक्षक विकास दुसाने यांनी कळंब येथील नामांकित डॉक्टरांनी काढलेल्या बीकेजी एलपी संजीवनी फार्मासिटिकल या वितरकाच्या औषधी दुकानात तपासणी केली. या तपासणीत asciclo+paracetamol+Sara Tab या गोळ्या व DKKEM हे सिरप या औषधाचे नमुने तपासले.ही औषधे तपासणीसाठी ताब्यात घेत संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली असता केलेल्या तपासणीत ही औषधे बनावट व अप्रमाणित असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. या औषधांच्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून अलफिनक हे घटक 79.06 टक्के तर सारा 52.87 टक्के इतक्या कमी प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यामध्ये डायक्लोफिनॅक सोडियम टॅबलेट 19.3 1 मि ग्रॅ.एवढे प्रमाण आहे. ते छापील घटकापेक्षा प्रमाणात कमी प्रमाणात आढळले आहे. ही औषधेही बनावट आढळून आल्याचे दुसाने यांनी सांगितले.
सदरील औषधाची विक्री आणि वापर बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सुमारे एक लाख 77 हजार 950 रुपये किमतीचा साठा जिल्हा औषध निरीक्षक विकास दुसाने यांनी जप्त केला आहे. ही औषधे लाइफ विजन हेल्थकेअर हिमाचल प्रदेश या कंपनीने तयार केली आहेत. या औषधांचे नमुने फेरतपासणीसाठी केंद्रीय औषध प्रयोगशाळा कोलकाता यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत.
दरम्यान शहरातील नामांकित डॉक्टरांनी मिळून बीकेजी एलपी ही फार्मासीट कंपनी काढली असून यामार्फत ते बनावट व अप्रमाणीत औषधे विकून जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आले आहे. तर कळंब हे सर्वच बाबतीत मोठी बाजारपेठ म्हणून परिचित झाल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही कित्येक रुग्ण औषधी खरेदी करण्यासाठी कळंब शहराकडे धाव घेत असतात. परंतु सदरील प्रकार समोर आल्याने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.