Advertisement

९४ % रुग्णांना लक्षणे नसणारे, मात्र तरीही वाढतोय कोरोना बळींचा आकडा 

प्रजापत्र | Tuesday, 09/03/2021
बातमी शेअर करा

आठवड्याभरात ९ बळी

बीड -जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असतानाच कोरोना बळींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाचे ५ बळी गेले होते, मात्र त्या तुलनेत मार्चच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ७ मार्च ) जिल्ह्यात ९ कोरोना बळींची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजही ९४ % रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, असे असतानाही मृत्यु वाढत असल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.
             बीड जिल्ह्यात मागील २ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याची परिस्थती असली तरी देखील कोरोना बळींची संख्या आता पुन्हा चिंताजनक होऊ लागली आहे . १ ते ७ मार्च या आठवड्यात जिल्ह्यात ५७३ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर ९ कोरोना बळी नोंदले गेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ९४ % आहे,५ % रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, आणि केवळ १ % रुग्णच क्रिटिकल असल्याचे आरोग्य विभागाची माहिती सांगते, तरीही मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.  जिल्ह्याचा मृत्युदर अजूनही २. ९१ % इतका नोंदवला गेला आहे . गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असतानाही मृत्यूंवर नियंत्रण का मिळत नाही हाच सध्या गंभीर प्रश्न आहे.

 

तुलनात्मक आकडेवारी
                             २१-२८ फेब्रुवारी               १- ८ मार्च
नवीन रुग्ण              ३ ६३                             ५७३
मृत्यू                        ५                                  ९
पॉझिटिव्हिटी दर        ९. १८ %                      ९. १५ %
मृत्यू दर                    २. ९५ %                     २. ९१ %
लक्षणे नसणारे रुग्ण     ९२. ८ %                     ९३. ९ %

 

Advertisement

Advertisement