केज दि.६ - केज - अंबाजोगाई राज्य मार्गावरील चंदनसावरगाव शिवारात नव्याने सुरू होत असलेल्या पेट्रोल पंपाच्या डिझेल टाक्यात टेस्टिंगसाठी ठेवलेले २ लाख ६१ हजार रुपयांचे २ हजार ९५० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर तालुक्यातील पांगरी येथील निलेश शंकर गायकवाड यांचा केज - अंबाजोगाई राज्य मार्गावरील चंदनसावरगाव शिवारात नव्याने सुरू होत असलेल्या पेट्रोल पंपाचे काम अंतिम टण्यात आहे. पेट्रोल पंपावर बसविण्यात आलेल्या डिझेल टाक्यांची टेस्टिंग करण्यासाठी त्यांनी २ हजार ९५० लिटर डिझेल मागवून टाक्यात सोडले होते.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून पाईपच्या मदतीने दोन लाख ६१ हजार रुपयांचे २ हजार ९५० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ( ता. ५ ) रात्री घडली. निलेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार जनार्धन कांबळे हे पुढील तपास करत आहेत.