बीड-सध्या देशभर कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असून यात जेष्ठ नागरिकांना आणि दुर्धर आजार असणारांना लस दिली जात आहे. मात्र त्याच वेळी लस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकार समोर येत असल्याने लसीबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र कोरोनाची लस म्हणजे आज घेतली की उद्या प्रभाव दाखवणारी नसून लसीचा पहिला डोस घेतल्यांनंतर 6 आठवड्यांनी या लसीचा प्रभाव जाणवणे सुरु होते असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. कोरोनावरील लस ही 2 टप्प्यात घ्यायची आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 4 आठवड्यांनी दुसरा बुस्टर डोस घ्यावा लागतो. त्यानंतरही लसीचा प्रभाव दिसायला आणखी 2 आठवडे जाऊ द्यावे लागतात , असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात कोरोना प्रतिबंधक अँटीबॉडी तयार व्हायला लस घेतल्याच्या 8-10 दिवसात सुरुवात होते, मात्र त्या अँटीबॉडी अपेक्षित पातळीवर पोहचायला 6 ते 12 आठवडे लागतात , त्यामुळे काहींना लस घेतल्यानंतर 6 आठवड्याच्या आत बाधितांसोबत संपर्क आला तर कोरोनाची बाधा होऊ शकते.
70 % आहे प्रभाव
त्यातही सध्या दिल्या जाणार्या कोरोना लसीचा प्रभाव 70 % इतका आहे. म्हणजे लस घेतलेल्या एकूण व्यक्तींपैकी 30 % लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मात्र किमान 70 % व्यक्तींना संरक्षण मिळणार असल्याने लस घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ञ नोंदवीत आहेत.