Advertisement

कोरोनाचा भडका, महानुभाव आश्रमातील २९ बाधित

प्रजापत्र | Friday, 26/02/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले
गेवराई : गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावातील येवले वस्तीवर असलेल्या महानुभाव आश्रमात कोरोनाचा भडका उडाला असून या आश्रमातील तब्बल २९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तहसीलदार सचिन खाडे यांनी ही माहिती दिली.
तालुक्यातील कोल्हेर गावातील येवले वस्तीवर महानुभाव आश्रम आहे. या ठिकाणी गुरुवारी (दि. २५ ) सोहळा होता. या सोहळयाला अनेकांनी हजेरी लावली होती. या आश्रमात अनेक साधक कायमस्वरूपी निवासी असतात. शुक्रवारी येथील सुमारे ६० व्यक्तींची कोरोनासाठी अँटिजन चाचणी करण्यात आली , यात तब्ब्ल २९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. एकाच आश्रमातील इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने प्रशासन हादरले आहे. तहसीलदार सचिन खाडे आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर आश्रमास भेट दिली असून कोरोना बाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
या आश्रमात गुरुवारी झालेल्या सोहळ्यास जिल्ह्यातील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांना जर काही कोरोनसदृश्य लक्षणे असतील तर त्यांनी स्वतःहून समोर येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे. दरम्यान प्रशासकीय पातळीवर बाधितांच्या संपर्क तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

 

Advertisement

Advertisement