बीडः बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत चालला असुन मागच्या ४८ तासात बीड जिल्ह्यातील तिघा कोरोनाग्रस्तांनी
उपचारादरम्यान विविध ठिकाणी अखेरचा श्वास घेतला तर क्वारंटाईन असलेल्या एका युवकाने आत्महत्या केली.
बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या एकुण रुग्णांचा आकडा केव्हाच दोनशेपार गेला आहे तर सक्रिय रुग्णांचा आकडा देखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच मागच्या ४८ तासात ३ कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. यातिल पाटोदा तालुक्यातील येवलवाडी व बेनसुर येथील प्रत्येकी एक पुणे येथील रुग्णालयात दगावले तर गेवराई तालुक्यातील उमापुरच्या रुग्णाचा बीडच्या जिल्हा रुग्णालयात बळी गेला. या तिघांनाही कर्करोग, न्युमोनिया आणि इतर आजार होते अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान चकलांबा येथील एका तरुणाला क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी उशीरा त्याने कोरोनाच्या भितीने क्वारंटाईन सेंटरमध्ये आत्महत्या केली. यापूर्वी बीड तालुक्यात एका तरुणाने कोरोनाच्या भीतीने होत असलेल्या उपेक्षेला कंटाळून आत्महत्या केली होती.
आज घडीला बीड जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या १० झाली आहे.
बातमी शेअर करा