धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत धाराशिव नगर परिषदेस तीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठी सुमारे ४ कोटी ५० लक्ष रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निधी तातडीने मंजूर करवून घेतला. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री श्री. सरनाईक यांनी आभार मानले.
येडशी येथे नुकत्याच घडलेल्या भीषण आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात धाराशिव जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांच्या गरजांचा एकत्रित प्रस्ताव प्राधान्याने सादर करावा. यामध्ये अद्ययावत अग्निशमन वाहने, आवश्यक मनुष्यबळ तसेच बचाव साहित्य व उपकरणांचा समावेश करावा. या सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राधान्याने तरतूद करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.या बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती पुजार, धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व नगर परिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाचे विभाग नियंत्रक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.जिल्ह्यात सध्या १० अग्निशमन वाहने उपलब्ध असून आणखी नऊ वाहनांची आवश्यकता असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांकडून अग्निशमन अधिकारी व कर्मचारी, वाहनांची संख्या, बचाव साहित्य आणि अन्य उपकरणांच्या आवश्यकतेचा सविस्तर तपशील आठवडाभरात मागवावा. त्यानंतर आग, पूर आदी सर्व प्रकारच्या आपत्तींचा विचार करून जिल्ह्याचा सर्वसमावेशक प्रस्ताव प्राधान्याने सादर करावा, असे निर्देश मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्तावही प्राधान्याने सादर करावा. त्यास नगरविकास विभागाची मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागासाठीही अग्निशमन सेवेचे कार्यक्षेत्र निश्चित करणार
अग्निशमन सेवा केवळ नगर परिषदांच्या हद्दीपुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील नागरिकांनाही तिचा लाभ मिळाला पाहिजे. नगर परिषदांच्या जवळील गावांमध्ये अग्निशमन वाहन किती वेळात पोहोचू शकते, याचा विचार करून संबंधित नगर परिषदांचे कार्यक्षेत्र निश्चित करावे. या गावांमधील अग्निशमन सेवेची जबाबदारी संबंधित नगर परिषदेकडे द्यावी. वाहनांची संख्या, मनुष्यबळ आणि बचाव साहित्याचे नियोजन करताना ग्रामीण लोकसंख्येचाही विचार करावा. नगर परिषदांच्या हद्दीबाहेरील गावांनाही आपत्कालीन परिस्थितीत वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रत्येक नगर परिषदेचे अग्निशमन कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
फटाका उद्योग परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणार
जिल्ह्यातील फटाका उद्योग तसेच अन्य संवेदनशील ठिकाणी आग लागण्याचा धोका लक्षात घेऊन अशा परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्र किंवा अग्निशमन युनिट उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले. दिवाळीच्या कालावधीत जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या घटनांचा, उपलब्ध अग्निशमन वाहनांचा, मनुष्यबळाचा तसेच गतवर्षी पुरविण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन साहित्याचा आढावाही त्यांनी घेतला.येडशी येथे ९ नोव्हेंबर रोजी पहाटे दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना देण्यात आलेल्या शासकीय मदतीची माहिती घेत, मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.
धाराशिव जिल्ह्याची अग्निशमन वाहनांची निकड लक्षात घेता विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध व्हावा यासाठी बैठक आटोपताच मंत्री श्री सरनाईक यांनी तातडीने नगर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नगरविकास विभागाने ४ कोटी ५० लक्ष १० हजार रुपयांच्या निधीस विशेष बाब म्हणून तातडीची मंजुरी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्परतेमुळे या निधीतून धाराशिव नगर परिषदेस तीन अद्ययावत अग्निशमन वाहने खरेदी करणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे धाराशिव शहरासह परिसरातील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम आणि सुसज्ज होण्यास मदत होणार आहे, असे मंत्री श्री सरनाईक यांनी सांगितले. तसेच माजी आमदार ज्ञानराज चौघुले यांनीही 19 फेब्रुवारीला 2024 ला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे अग्निशमन वाहनाची मागणी केली होती तर येडशीच्या अगीच्या दुर्गाघटनेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अग्निशमन वाहन खरदेसाठी विशेषबाब म्हणून मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती.

