Advertisement

जमेल त्या प्रकल्पातून मिळवायचे , पुरस्कारासाठी उडवायचे

प्रजापत्र | Monday, 16/11/2026
बातमी शेअर करा

बीड दि. १५ (प्रतिनिधी ) : एनजीओ म्हणजे खरेतर स्वयंसेवी, सेवाभावी असे अपेक्षित असते, मात्र काही एनजीओला सेवाभाव हा फक्त नावालाच असतो. मध्यंतरी बीड जिल्ह्यातील 'देशमुखी ' थाटात वावरणाऱ्या आणि 'चाईल्ड  लाईन ' पासून 'ते 'जलसंधारण ' अशा अनेक प्रकल्पांवर आपलीच 'एचपी ' आहे अशा अविर्भावात असलेल्या एका एनजीओच्या प्रमुखाला पुरस्काराच्या लालसेपोटी विदेशी व्यक्तीकडून मोठा गंडा बसला होता. त्या संस्थेचे एक एक कारनामे समोर येत असताना हे प्रकरण पुन्हा ताजे झाले आहे.
एनजीओ प्रकल्प मिळविण्यासाठी कशाचे भांडवल करतील याचा काही नेम नाही. त्यातच परदेशातील अनेक संस्था वेगवेगळ्या कारणासाठी म्हणून निधी द्यायला तयार असतातच. अशीच एक संस्था, महायुद्धाच्या काळात गाढवांचा वापर शास्त्रे , रसद वाहण्यासाठी झाला होता त्याचे स्मरण म्हणून भारतात गाढवे पाळायला म्हणे मदत देत होती. झाले, आता संस्था मदत देतेय म्हटल्यावर काय, बीड जिल्ह्यातील 'देशमुखी ' थाटातील एका एनजीओने म्हणे हा प्रकल्प देखील मिळविला , त्याची अंमलबजावणी बीड जिल्ह्यात नाही मात्र लगतच्या जिल्ह्यात झाल्याचे सांगितले जाते. किती गाढव आणले, किती पाळले , पाळले , संवर्धन केले म्हणजे नेमके काय केले आणि त्या गाढवांचे पुढे काय झाले ते त्या संस्थेलाच माहित. मात्र यातून त्या संस्थेला रग्गड पैसे मिळाला.
मध्यंतरी पुण्याच्या गणेशोत्सवादरम्यान बापट यांनी  'कुर्यात गर्दभ रोहनम ' चर्चेत आले होते. म्हणजे प्रसिद्धीसाठी अगदी गाढवाची स्वारी देखील करायची, इथे घडवाची स्वारी नाही, मात्र प्रसिद्धीसाठी विदेशातून पुरस्कार मिळवायची 'लहर ' एका एनजीओच्या प्रमुखाला आली. असे काही पुरस्कार असतील तर मग पुन्हा पुढचे प्रकल्प मिळवायला सोपे जात असावे कदाचित . मग पुरस्काराच्या अपेक्षेने त्यांनी शोधाशोध केली आणि एका विदेशी व्यक्तीला रग्गड पैसे दिला, मात्र त्यानंतर ना पुरस्कार मिळाला ना काही , अखेर पोलिसात तक्रार झाली, त्या विदेशी व्यक्तीला अटक झाली, पण देशमुखी थाटात वावरणाऱ्या एनजीओ प्रमुखाचे पैसे गेले ते गेलेच. आता त्या विदेशी व्यक्तीचे 'ग्राम ' शोधून त्याच्या मालमत्तेवर 'विकासा'च्या नावावर मिळविलेल्या या निधीची 'एचपी ' थोडीच चढवता येणार , त्या एनजीओ प्रमुखाला म्हणे गप गुमान झालेले नुकसान सहन करावे लागले . आता याला कोणी गाढवातून कमवायचे आणि पुरस्काराच्या गाढव लोभात गमवायचे असे म्हणत असतील तर म्हणोत बिचारे (क्रमशः )

Advertisement

Advertisement