Advertisement

पश्चातबुध्दी का कृतघ्नता

प्रजापत्र | Monday, 15/02/2021
बातमी शेअर करा

 आपण जोपर्यंत एखाद्या यंत्रणेचा, व्यवस्थेचा भाग असतो, तो पर्यंत त्या व्यवस्थेची भलामण करायची आणि नंतर त्याच व्यवस्थेला नावे ठेवायची या कृतीला पश्चातबुद्धी असे म्हणतात , किंबहुना अशी वृत्ती हा त्या व्यवस्थेप्रती कृतघनपणा असतो. देशाचे माजी सरन्यायाधीश तथा भाजपचे राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांचे विधान याच पठडीतले आहे. 'न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाण्यासारखी परिस्थती नाही, देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे आहे आणि तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही , मी न्याय मागण्यासाठी न्यायालयात कधीच जाणार नाही ' असे वक्तव्य खुद्द देशाचे सरन्यायाधीश राहिलेल्या व्यक्तीने केले आहे. न्यायव्यवस्थेला हा फार मोठा धक्का आहे. हेच वक्तव्य जर इतर कोणी केले असते तर आतापर्यंत भाजपच्या प्रेरणेतून पाच पन्नास लोकांनी लगेच न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्याची परवानगी देशाच्या सॉलिसिटर जनरल यांच्याकडे मागितली असती. मात्र आता खुद्द भात खासदारांनीच असे विधान केल्याने भाजपेयींना यात न्यायालयाचा अवमान वाटणार नाही. रंजन गोगोई यांनी केलेले वक्तव्य खरोखरच गांभीर्याने घ्यावे असे आहेच. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.शरद पवार यांनी देखील हे वक्तव्य चिंताजनक असून त्यांनी न्याय व्यवस्थेतील वास्तव तर मांडले नाही ना अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्यायव्यवस्थेबद्दल असे तर मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने बोलले जात आहेच, मात्र आता माजी सर न्यायाधीश याबद्दल बोलले असल्याने व्यवस्थेने याचे आत्मचिंतन केले पाहिजे.

गोगोई यांचे वक्तव्य धक्कादायक आहेच, मात्र हे वक्तव्य करण्याचा न्या. गोगोई यांना अधिकार आहे का याचेही उत्तर शोधावे लागावे लागेल. रंजन गोगोई हे अगदी काही महिन्यांपर्यंत या देशाचे सर न्यायाधीश होते, मग ही व्यवस्था जीर्ण झाली असेल तर गोगोई या व्यवस्थेत असताना त्यांनी यासाठी काय केले ? या बद्दलही खरेतर गोगोई यांनी भाष्य करायला हवे होते. हे तेच गोगोई आहेत , ज्यांनी काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपध्दतीवर, तत्कालीन सरन्यायाधीशांच्या कामकाजाच्या पद्धतीवर पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्यावेळी देशाने त्यांच्या धाडसाचे कौतुक केले होते. मात्र त्याहीवेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी का असे प्रश्न उपस्थित झाले होतेच. पुढे हेच रंजन गोगोई सरन्यायाधीश झाले. त्यानंतर त्यांनी ज्या मास्टर ऑफ रोस्टरवर आक्षेप घेतले होते, त्यावर फार काही मूलगामी बदल केल्याचे ऐकिवात नाही. उलटपक्षी त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील नंतर आक्षेप घेतले गेलेच. पद्धतीने त्यांनी स्वतःच्या निवृत्तीपूर्वी अनेक महत्वाच्या प्रकरणांचा 'निपटारा ' केला , त्याबद्दल देखील चर्चा झाल्याचं होत्या . मात्र या सर्व काळात, गोगोईंना  ही व्यवस्था जीर्ण वाटली नव्हती, किंवा या व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी त्यांनी काही विशेष पाऊले देखील उचलली नव्हती, मग आता त्या व्यवस्थेच्या  बाहेर पडल्याबाबरोबर गोगोईंना याचा साक्षात्कार झाला असेल तर त्यांच्या न्यायबुद्धीवर कितपत विश्वास ठेवायचा ?

न्यायपालिकेतील व्यक्तींनी निवृत्तीनंतर लगेच लाभाची पदे स्वीकारू नयेत अशी अपेक्षा असते , तसा कायदा नसला तरी काही संकेत असतात , असे असताना निवृत्तीनंतर लगेच गोगोई भाजपच्या कृपेने खासदार होतात , यात गोगोईंना काहीही वावगे वाटत नाही, ते गोगोई आज न्यायव्यवस्था जीर्ण झाली आणि तेथे न्याय मिळत नाही असे म्हणत असतील, तर व्यवस्थेला या अवस्थेला न्यायला कोण कोण जबाबदार आहेत ? आपलाही त्यात काही ना काही वाट आहे असे गोगोईंना वाटते का ? आणि तसे सांगण्याचे धारिष्ट्य ते दाखविणार आहेत का ? न्यायव्यवस्थेत न्याय मिळत नाही असे आता गोगोईंना वाटत असेल तर जे निकाल गोगोईंनी काही महिन्यांपूर्वीच दिले आहेत, त्या निकालांनी काय म्हणायचे ? व्यवस्थेबद्दल गोगोई काय बोलले हे महत्वाचे आहे, त्यावर चिंतन आणि परीक्षण देखील व्हायलाच हवे , कदाचित गोगोई सत्यच बोलत असतील आणि मागच्या काही महिन्यात प्रशांत भूषण यांच्यापासून कुणाल सामरांपर्यंत अनेकांनी जे काही म्हटले होते , त्यालाही गोगोईंच्या या वक्तव्यामुळे पुष्टी मिळेल असे मानायला हरकत नाही, पण हे बोलायला गोगोईंना दात आहेत का ? 
 

 

Advertisement

Advertisement