बीड दि. १९ (प्रतिनिधी ): एकेकाळी शरद पवारांना मानणारा जिल्हा अशी ओळख असलेल्या (Beed)बीड जिल्ह्यातून पार्थ पवारांना लाँच करता येते का याची चाचपणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जात असल्याची खात्रीशीर माहिती आहे. विशेष म्हणजे यासंदर्भाने काही अधिकाऱ्यांनी येऊन गोपनीय माहिती देखील काढली असून त्याचे अहवाल देखील अजित पवारांकडे गेले असल्याचे सांगितले जाते. (Ajit Pawar) अजित पवार सध्या बीडचे पालकमंत्री असून त्यामुळे येथील प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारीक लक्ष्य आहेच, आता बीड पार्थ पवारांसाठी अधिकाधिक 'सेफ हाऊस ' करता येईल का याची पडताळणी केली जात असल्याची माहिती आहे.
राज्याच्या राजकारणात बीड (Beed)जिल्हा हा शरद पवारांना (Sharad pawar)मानणारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणातील प्रभाव वाढल्यानंतर या संकेताला काहीसा छेद बसला तरीपवार कुटुंबाचा या जिल्ह्यावरचा प्रभाव अधून मधून दिसतच राहिला . आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले असलेले अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत. मागच्या काळात बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठ्याप्रमाणावर उलथापालथ झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा झालेला पराभव, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश, त्यानंतर बीड जिल्ह्यातील दोघांना मंत्रिमंडळात मिळालेली संधी, नंतर धनंजय मुंडेंना द्यावा लागलेला राजीनामा आणि अजित पवारांकडे आलेले बीडचे पालकमंत्रिपद , या साऱ्या घडामोडीच्या पर्श्वभूमीवर बीड जिल्ह्यावर एक नवा राजकीय प्रयोग करता येतो का याची चाचपणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जात असल्याची माहिती आहे. त्यासाठीच बीड जिल्ह्यातून तरुणांची फळी थेट पार्थ पवारांशी कशी जोडली जाईल हे एकीकडे पाहिले जात असतानाच बीड जिल्ह्यात कोणीच , अगदी दुसऱ्या पक्षातील लोकप्रतिनिधी देखील नाराज राहणार नाहीत हे अजित पवार पाहत आहेत. विकासाच्या कामात राजकारण नको असे जरी याबद्दल अजित पवार म्हणत असले तरी उद्या वेळ पडल्यास बीड अधिकाधिक सेफ कसे राहील यासाठीची ही पायाभरणी असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
यापूर्वी एकदा पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर (Parth Pawar) पार्थ पवार यांना राजकारणात सक्रिय करण्याच्या हालचाली काही काळ थंडावल्या होत्या , मात्र आता पुन्हा एकदा (Parth Pawar) पार्थ पवारांची सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेतला जात आहे. त्यादृष्टीने बीड जिल्हा कितपत उपयोगी ठरेल? येथील जातय, सामाजिक समीकरणे कशी ठरतील आणि येथील वेगवेगळ्या राजकीय गटांची भूमिका काय असेल याची चाचपणी केली जात आहे. अर्थात हे सर्व सध्या अगदीच प्राथमिक स्वरूपात आहे, मात्र बीड जिल्हा अजित पवारांना मानणारा जिल्हा करायचा आणि येथून अजित पवारांनाच कोणताही उमेदवार निवडून येईल परिस्थिती निर्माण करण्याचे अजित पवार गटाचे उद्दिष्ट असल्याचे समजते.

बातमी शेअर करा