Advertisement

मनोज जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारली 

प्रजापत्र | Sunday, 13/09/2026
बातमी शेअर करा

 मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे जाहीर केले आहे.मंगळवार १५ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे अंतरवली सराटीतून मुंबईकडे निघणार असून १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
   गेल्या वर्षीचा अनुभव, गणेशोत्सवाचा काळ, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक कोंडी या सर्व बाबींचा विचार करून आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

 

पोलिसांनी परवानगी नाकारण्यामागील ७ मुख्य कारणे
१. उपोषण व अनिश्चित कालावधीबाबतचे नियमभंग

उपोषणास मनाई: नियम 2025 मधील नियम 11 (ड) नुसार आंदोलनादरम्यान आमरण उपोषण किंवा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यास सक्त मनाई आहे.

मुदतीचा भंग: एका आंदोलनास एका वेळी फक्त एकच दिवसासाठी (सकाळी ९ ते संध्याकाळी ६) परवानगी दिली जाते. शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी नसते. जरांगेंनी शनिवार (१९ सप्टेंबर) पासून पुढे मागण्या मान्य होईपर्यंत अनिश्चित कालावधीसाठी उपोषणाची मागणी केली आहे, जे नियमांचे उल्लंघन आहे.

२. वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी

वाहनांवरील मर्यादा: नियमानुसार मालवाहतूक किंवा जड वाहनांना परवानगी नाही आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने मर्यादित वाहनांनाच प्रवेश दिला जातो.

वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता: जरांगेंनी "गाड्या लाखात आहेत" असे वक्तव्य अंतरवाली सराटीमध्ये केलं. गेल्या वर्षी सुमारे 5,000 वाहने दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे उभी करून रस्ता रोको केला. यंदाही तशीच शक्यता असल्याने सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे.

३. आंदोलकांची मर्यादा व जागा

कमाल संख्या 5,000: नियम 6 नुसार आंदोलकांची कमाल संख्या 5,000 असावी लागते. आझाद मैदानात 7,000 चौरस मीटर जागा राखीव असून तेथे फक्त 5,000 आंदोलक समावू शकतात.

लाखोंच्या संख्येचे आवाहन: जरांगेंनी "लाखोंच्या संख्येने मुंबईत या" असे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी 5,000 ची मर्यादा असताना सुमारे 40,000 आंदोलक आले होते, ज्यामुळे इतर आंदोलकांच्या हक्कांवर गदा आली होती.

४. सार्वजनिक सुव्यवस्था व हिंसक/नियमबाह्य कृत्य

सार्वजनिक ठिकाणी अडथळा: मोर्चे, रस्ता रोको, रेल्वे स्थानके, महापालिका मुख्यालय व महत्त्वाच्या चौकांमध्ये रस्त्यावर बसणे किंवा झोपणे यावर मनाई आहे.

मागील आंदोलनाचा अनुभव: गेल्या वर्षी बेस्ट बसमध्ये घुसखोरी, वाहनांवर चढून विक्षेप कृत्य करणे, नारेबाजी करणे यामुळे १३ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. लाखो आंदोलक आल्यास त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही.

५. आरोग्य व स्वच्छतेचा प्रश्न

सार्वजनिक आरोग्य: नियम ११ (ज) नुसार विनिर्देशित क्षेत्रात अन्न शिजवणे व कचरा टाकणे मना आहे. गेल्या वर्षी रस्त्यावर व वाहनांमध्ये अन्न शिजवून कचरा टाकल्याने तसेच फूटपाथवर अंघोळ केल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

रुग्णालयांवर परिणाम: आझाद मैदान परिसरात जी.टी., कामा, सेंट जॉर्ज आणि बॉम्बे हॉस्पिटल ही मोठी रुग्णालये आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे रुग्णसेवेवर आणि रुग्णवाहिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

६. न्यायालयीन कामकाज व आर्थिक केंद्र बाधित होणे

न्यायालयीन कामकाजात अडथळा: दक्षिण मुंबईत मा. उच्च न्यायालय, सत्र न्यायालय व दंडाधिकारी न्यायालये आहेत. गेल्या वर्षी न्यायमूर्ती व वकिलांना न्यायालयात पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता.

व्यापारावर परिणाम: क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजार, बीएसई (BSE), आरबीआय (RBI) यांसारखी महत्त्वाची आर्थिक केंद्र बंद पडल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतात.

७. गणेशोत्सव व सुरक्षेचे कारण

गणेशोत्सव काळ: १४ सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत आहे. या काळात भाविकांची मोठी गर्दी असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई कायम संवेदनशील असते.सुरक्षेत अडथळा: आंदोलनाची अलोट गर्दी झाल्यास पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
 

Advertisement

Advertisement