बीड दि.१२ (प्रतिनिधी): मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बीड ग्रामीण पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू असताना बनावट दारू निर्मिती करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.पोलिसांच्या पाठलागादरम्यान गोसापुरी गावाजवळ संशयितांनी चारचाकी वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.पोलिसांनी वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये तयार बनावट दारूसह दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले.याप्रकरणी वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि.११) सपोनि बाळराजे दराडे हे एपीआय सोनवळे पोलीस हवालदार सतीश मुंडे, अजय सानप, चालक पोलीस शिपाई श्री.चव्हाण व होमगार्ड प्रशांत वीर यांच्यासह बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना दिसले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. मात्र, चालकाने वाहनाचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, नामलगाव फाट्याजवळ या वाहनाची कुत्र्याला धडक झाली.त्यानंतर वाहन घोसापुरी गावाच्या दिशेने वळविण्यात आले.पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. घोसापुरी गावाच्या अलीकडे वाहन थांबवून त्यातील दोन इसम अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता शरीरास घातक असलेले तसेच रासायनिक पदार्थांपासून बनावट दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य,तयार बनावट दारू व इतर साहित्य आढळून आले. या कारवाईनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींची माहिती घेत घोसापुरी गावातील एका व्यक्तीच्या घराजवळील पत्र्याच्या शेडची झडती घेतली.या शेडमध्ये आरएस कंपनीच्या रिकाम्या बाटल्या, सील-पॅक स्टिकर्स तसेच बनावट दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०४ एनएच १०६५ तयार बनावट दारू, दारू निर्मितीचे साहित्य, रिकाम्या बाटल्या, सील-पॅक स्टिकर्स आदी मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणातील पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा
