Advertisement

नेकनूर पोलिसांची मोठी कारवाई 36 गोवंश जनावरांची सुटका

प्रजापत्र | Tuesday, 08/09/2026
बातमी शेअर करा

नेकनूर दि.८(वार्ताहार): गोवंश जनावरांची अवैध वाहतूक व कोंडून ठेवण्याच्या प्रकारावर नेकनूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३६ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत गायी, बैल व वासरे यांच्यासह गोवंश जनावरे आणि त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे आयशर वाहन असा एकूण ३० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.७) रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी,केज श्री.वेंकटराम यांना गोवंश जनावरांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नेकनूर पोलिसांच्या पथकाने नेकनूर येथील डी.एड. कॉलेजसमोरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.छाप्यादरम्यान शेडमध्ये गायी, बैल व वासरे अशी एकूण ३६ गोवंश जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंडून ठेवलेली पोलिसांना आढळून आली.जनावरांना पुरेशी जागा नसल्याचे तसेच त्यांच्यासाठी चारा व पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जनावरांना क्रूरतेने वागविल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका केली.दरम्यान, शेडच्या परिसरात आयशर वाहन क्रमांक एमएच १७ -AG-५४३९ आढळून आले. तपासात सदर वाहन गोवंश जनावरांच्या वाहतुकीसाठी आणण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी हे वाहनही ताब्यात घेतले. कारवाईमध्ये ३६ गोवंश जनावरे व आयशर वाहन असा एकूण ३०,५४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सुटका केलेल्या सर्व जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या सुरक्षित संगोपनाची व्यवस्था करण्यासाठी जनावरांना गोशाळेत पाठविण्यात आले. या प्रकरणी बशीर ऊर्फ बशू कुरेशी, रा. नेकनूर याच्याविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.वेंकटराम, केज नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शंकर गलधर,सचिन धायगुडे,पोह रतन निगुळे, पोअं रामहरी जवरे, आश्रुबा मुरकुटे, विशाल जगताप व शशिकांत ढाकणे यांनी केली.

Advertisement

Advertisement