Advertisement

छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग

प्रजापत्र | Friday, 04/09/2026
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर  : शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात म्हणजेच एनआयसीयूमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली असून आगीच्या वेळी एनआयसीयूमध्ये ९ बालकं उपचार घेत होती. तर एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 

दरम्यान, आग लागल्याचं समजताच अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. सर्व ९ बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर यातील ५ बालकांना घाटी रुग्णालयात, ३ बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या १० ते १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे आग हॉस्पिटलच्या इतर भागात पसरण्याचा धोका टळला.महत्त्वाचं म्हणजे, ज्या पहिल्या मजल्यावर एनआयसीयू आहे, तिथे एकूण ५८ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये ८ एनआयसीयूतील बालकं, जनरल विभागातील ३६ आणि स्पेशल रूममधील १३ रुग्णांचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार सर्व रुग्णांना सुरक्षितपणे हलवण्यात आलंय. बचावकार्याला वेग देण्यासाठी तब्बल ३० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तर जवाहरनगर पोलीस आणि आरसीपीच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. वेळीच मिळालेली माहिती, अग्निशमन दलाची तत्परता आणि पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची धावपळ. यामुळे एशियन हॉस्पिटलमधील ९ चिमुकल्यांसह ५८ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र यां घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Advertisement

Advertisement