Advertisement

कोर्ट सुरु असतानाच न्यायाधीशांना सक्तीची सेवानिवृत्ती

प्रजापत्र | Thursday, 03/09/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.३(प्रतिनिधी):अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी कोर्ट सुरु असतानाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा  यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश बीड यांच्या पथकाने या आदेशाची अंमलबजावणी केली. या घटनेने न्यायालयीन वर्तुळात खळबळ माजली आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी देखील अंबाजोगाईच्या जिल्हा न्यायालयात अशीच एका न्यायाधीशांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती.

न्यायालयीन कार्यपद्धतीमध्ये अपवादात्मक आणि न्यायालयीन शुचिता राखण्याच्या दृष्टिकोनातून केली जाणारी कारवाई म्हणून सक्तीच्या सेवानिवृत्तीकडे पाहिले जाते. गुरुवारी अंबाजोगाई जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरु असतानाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.रचना तेहरा यांच्या न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश बीड यांच्या पथकाने न्या.डॉ तेहरा यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या आदेशांची अंमलबजावणी केली.विशेष म्हणजे हे होण्यापूर्वी न्या. रचना तेहरा यांनी आगामी लोकअदालतीच्या संदर्भाने सर्व न्यायाधीश,भूसंपादन अधिकारी आणि संबंधितांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांचे नियमित न्यायालयीन कामकाज सुरु होते. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

 

 

पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या

आज ज्या कक्षात न्या. रचना तेहरा यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीचे कारवाई करण्यात आली, त्याच कक्षात १५ वर्षांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना अशीच सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. या घटनेच्या अंबाजोगाईतील विधिज्ञांच्या आठवणी आज ताज्या झाल्या.

 

Advertisement

Advertisement