बीड दि.२२(प्रतिनिधी): शहरातील रिलायन्स पेट्रोलपंप ते अंबिका चौकाकडे जाणाऱ्या बायपास रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर शनिवार (दि.२२) रोजी पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत २५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड शहरातील रिलायन्स पेट्रोलपंप ते अंबिका चौकाकडे जाणाऱ्या बायपास रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून एमएच २३ एयू ८८५५ क्रमांकाचा हायवा टिप्पर अडवून तपासणी केली.असता त्यामध्ये अंदाजे ६ ब्रास वाळू आढळून आली.चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव जयराम दिगंबर दिंडे (वय १९, रा. बागपिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे सांगितले. सदर वाळू गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक व विक्रीसाठी आणल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या कारवाई अंदाजे २५ लाख रुपये किमतीचा हायवा,३६ हजार रुपये किमतीची वाळू आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २५ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी चालक जयराम दिंडे,वाहनमालक शेख वसीम करीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख,पोलीस उपअधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री.सय्यद,अविनाश सानप, संतोष रणदिवे,कुलदीप औसरमल,शशिकांत ढाकणे आणि विशाल जगताप यांनी केली.

