Advertisement

विलास घुले हत्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

प्रजापत्र | Friday, 21/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२१(प्रतिनिधी):केज तालुक्यातील टाकळी येथील स्व.विलास घुले यांच्या खुन प्रकरणातील आरोपींना मकोका लावण्यात यावा,पुरवणी जबाब मधील आरोपींना तात्काळ अटक करावी, घुले कुटूंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी या मागणीसाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.  
   बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण येथून सुरू झालेला हा विराट मोर्चा सुभाष रोड- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक-बसस्थानक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतिर्थ) परिसर-नगर रोड मार्गे जिल्हाधिकार्यालयावर धडकला. न्याय द्या, न्याय द्या अशी मागणी करत मोर्चेकऱ्यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेतले होते. या मोर्चामध्ये जष्ठ विधिज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते हे देखील सहभागी झाले होते. दुपारी उशिरा मोर्चाचे रूपांतर सभेत झाले होते. दरम्यान गेल्या सतरा दिवसांपासून स्व. विलास घुले यांचे कुटूंबिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र प्रशासनाने अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही. मोर्चात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर 
अॅड. गुणरत्न  सदावर्ते यांनी उपोषणास्थळी जाऊन घुले कुटूंबियांची भेट घेतली.

 

Advertisement

Advertisement