लातूर : राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर परीक्षा, पेपरफुटीसंदर्भाने झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, झेन-जी तरुणाई आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Deepke) यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यानंतर, आता स्कूल ठीक करो मोहिम हाती घेतली आहे. १५ ऑगस्ट रोजी अभिजीत दिपकेंनी त्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी करुन अभियानाची सुरूवात केली. आता, ते लातूर जिल्ह्याच्या औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत पोहोचले आहेत. औसाच्या जिल्हा परिषदेत शाळेत खासगी शाळेचे विद्यार्थी आणून बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी स्कूल ठीक करो अभियानांतर्गत आज लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत भेट दिली. त्यावेळी, दिपकेंच्या समोरच विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळेतील असल्याची कबुली दिली. औसा शहरात असलेली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे खासगी शाळा पीपल्स प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी आढळून आले आहेत. 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या अभियानात ही माहिती आढळून आली. त्यामुळे, खरंच राज्यातील सरकारी, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी आणि शाळेची काय दूरवस्था झालीय हे चित्र समोर आलं आहे. जिल्हा परिषद शाळेतील या घटनेबाबत शाळेतील कोणताही सक्षम अधिकारी माहिती देत नसल्याने अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा औसा पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाकडे वळवला आहे. दरम्यान, एका आठवड्याच्या आत औसाचे गैरहजर असलेले BDO आणि संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा अभिजीत दिपकेंकडून देण्यात आला आहे. येथील मतदारसंघाचे आ.अभिमन्यू पवार आहेत. त्यामुळे, आता अभिमन्यू पवार हे देखील याबाबत काही ठोस भूमिका घेतात का हे पाहावे लागेल.

