मुंबई: आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादने आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. जवळपास प्रत्येक दिवशी एफडीएच्या पथकांकडून राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात संबंधित आस्थापानांवर कारवाई करुन भेसळयुक्त माल पकडला जात आहे किंवा हॉटेल, डेअरी, दुकानात अस्वच्छता असल्याच्या कारणावरुन संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित केले जात आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एफडीएच्या या धडक कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी एफडीएकडून धडक कारवाई सुरु आहे. याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एफडीएच्या कारवाईचं कौतुक केलं. भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरु आहे, याचा मला आनंद आहे. तसेच यापुढेही एफडीएची अशी धडक कारवाई सुरु राहील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

