Advertisement

पहिल्या श्रावण सोमवारी वैद्यनाथांच्या दर्शनाला अलोट गर्दी

प्रजापत्र | Monday, 17/08/2026
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.१७(प्रतिनिधी): 'हर हर महादेव' आणि 'बम बम भोले' च्या गगनभेदी जयघोषाने आज, पहिल्या श्रावण सोमवार (दि.१७ ) रोजी संपूर्ण परळी वैजनाथ नगरी दुमदुमून गेली. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सण एकाच दिवशी आल्याने प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासह देशभरातील भाविकांचा महापूर लोटला. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप पिके धोक्यात आली असून, हजारो शेतकऱ्यांनी व भाविकांनी प्रभू वैद्यनाथांच्या चरणी मुसळधार पावसासाठी साकडे घातले.

 

श्रावण सोमवारनिमित्त मंदिर प्रशासनाने मध्यरात्री १२ वाजताच भाविकांसाठी दरवाजे खुले केले. परंपरेनुसार महिला भाविकांनी शिवमूठ म्हणून तांदूळ आणि बिल्वपत्र अर्पण केले. वैद्यनाथाच्या शिवलिंगात धन्वंतरी व अमृताचा वास असल्याची भक्तांची श्रद्धा असल्याने स्पर्शदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे ३ हजार किलो विविधरंगी फुलांनी मंदिराची मनमोहक सजावट करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख, माजी सेक्रेटरी प्रा. बाबासाहेब देशमुख, अनिल तांदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांच्यासह सर्व विश्वस्तांनी दर्शन रांगांचे चोख नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन गट्टूवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात ३०० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता.

 

कर्नाटकातील अडीच फूट उंचीच्या शिवपुत्र यांचे विशेष दर्शन

पहिल्या श्रावण सोमवारी मंदिरात एक अत्यंत भावुक प्रसंग पाहायला मिळाला. कर्नाटकातील ५४ वर्षीय आणि अवघ्या अडीच फूट उंचीचे भाविक शिवपुत्र हे प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी आले होते. प्रचंड गर्दी असतानाही वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आस्थेने पुढे नेत प्रभू वैद्यनाथांचे सुलभ दर्शन घडवून आणले. दर्शन झाल्यानंतर समाधान व्यक्त करताना शिवपुत्र म्हणाले की, "एवढ्या मोठ्या गर्दीत मला देवस्थानने दर्शन घडवले. श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शन मिळाल्याने मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो."

 

Advertisement

Advertisement