Advertisement

भाजपाची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर

प्रजापत्र | Monday, 17/08/2026
बातमी शेअर करा

 नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल करत नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. नव्या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    भाजपाच्या संघटनात्मक रचनेत राष्ट्रीय सरचिटणीस हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते. त्यामुळे विनोद तावडे, इराणी आणि देब यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी पक्षाच्या राष्ट्रीय संघटनात्मक कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांचा राष्ट्रीय संघटनेतील प्रभावी सहभाग यापूर्वीही राहिला आहे. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यापूर्वीही कार्यरत होते. नव्या संघटनात्मक फेरबदलांत काही नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव तसेच विविध मोर्चांच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षाची राष्ट्रीय संघटनात्मक टीम नव्याने मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मानले जात आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांनी जानेवारी २०२६ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय संघटनेतील हा महत्त्वाचा बदल आहे. विनोद तावडे यांच्यावर पुन्हा एकदा भाजपाच्या राष्ट्रीय संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय सरचिटणीसांच्या यादीत तावडे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय संघटनेत त्यांना मिळालेली ही महत्त्वाची जबाबदारी राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनेही चर्चेची ठरणार आहे. त्याशिवाय डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच उत्तर मुंबईचे खासदार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  

 

'अशी' आहे भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारणी

राष्ट्रीय उपाध्यक्ष

वसुंधरा राजे सिंधिया – राजस्थान
तीरथ सिंह रावत – उत्तराखंड
राम माधव – दिल्ली
बैजयंत जय पांडा – ओडिशा
डी. पुरंदेश्वरी – आंध्र प्रदेश
रेखा वर्मा – उत्तर प्रदेश
वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी – गुजरात
डॉ. भारती प्रवीण पवार – महाराष्ट्र
सरदार मनप्रीत सिंह बादल – पंजाब
लाल सिंह आर्य – मध्य प्रदेश
प्रो. एम. नागराज – कर्नाटक
प्रो. तारिक मन्सूर – उत्तर प्रदेश
डॉ. मधुचंद्रा कार – पश्चिम बंगाल

राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन)

बी. एल. संतोष – दिल्ली

राष्ट्रीय सहसरचिटणीस (संघटन)

शिवप्रकाश – मुंबई
सौदान सिंह – चंदीगड

राष्ट्रीय सरचिटणीस

विनोद तावडे – महाराष्ट्र
सुनील बंसल – दिल्ली
बिप्लब कुमार देब – त्रिपुरा
स्मृती इराणी – उत्तर प्रदेश
डॉ. सतीश पूनिया – राजस्थान
गजेंद्र पटेल – मध्य प्रदेश
हरीश द्विवेदी – उत्तर प्रदेश
संजय भाटिया – हरियाणा

 

Advertisement

Advertisement