बीड दि. ३ (प्रतिनिधी ) : बीड नागरपालकेत राष्ट्रवादीमधील बंडाळी उफाळून आल्यानंतर आता दोन्ही क्षीरसागर एकत्र येतील आणि बीड नगरपालिकेत सत्तांतर होईल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. अर्थात थेट जनतेतून निवड आणि त्यातही राखीव प्रवर्गातील महिला यामुळे नगराध्यक्षांना असलेल्या वैधानिक संरक्षणामुळे सध्यातरी थेट नगराध्यक्षांवर ववश्वास आणता येण्यासारखी परिस्थिती भाजप आणि राष्ट्रवादी शप एकत्र आले तरी निर्माण होणार नाही. अशावेळी जर नगराध्यक्ष वगळता इतर पदाधिकारी बदलणार असतील तर राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाला सामावून घेण्याची मानसिकता आज तरी ना आ. संदीप क्षीरसागर यांची आहे ना भाजपच्या क्षीरसागर दाम्पत्याची. मग उद्या जरी सत्तांतर झाले तरी राष्ट्रवादीमधील बंडखोरांच्या पदरात काय पडणार हा मोठा प्रश्न राहणार आहे.
सात महिन्यापूर्वी झालेल्या बीड नगर पालिकेच्या निवडणुकीत दिवंगत अजित पवारांचे शब्द आणि आ. विजयसिंह पंडित यांचे नेतृत्व यावर विश्वास ठेवत जनतेने बीड नगरपालिकेत सत्तेची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिली. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासोबत जुळली सामाजिक समीकरणे देखील या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या विजयला कारणीभूत ठरली. मात्र काही काळातच राष्ट्रवादीमध्ये मोठ्याप्रमाणावर बेदिली निर्माण झाल्याचे चित्र आहे. नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस , एमआयएम, शिवसेना अशा सर्वांची एकत्रित आघाडी म्हणून गट तयार करण्यात आला आहे. त्या गटाचे गटनेते फारूक पटेल असून सध्या तेच राष्ट्रवादीच्या बंडखोर गटात आहेत.
राष्ट्रवादीमध्ये बंडाळी निर्माण होताच आ. संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश व डॉ सारिका क्षीरसागर यांच्याकडून आता नगरपालिकेच्या राजकारणात एकत्र येण्याच्या हालचालींवर मंथन सुरु झाले आहे. ते खरोखर एकत्र येतील का नाही हे काळ ठरवेल मात्र ते एकत्र आले तर उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल होऊ शकतील. नगराध्यक्षपदावर त्याचा थेट परिणाम आजच होण्याची कोनतीही शक्यता नाही. त्यामुळे आज तरी नगराध्यक्षांचे पद शाबूत राहील असेच चित्र आहे. अशावेळी बंडखोर गटातील काही सदस्यांना देखील त्यांच्याकडील पदाला मुकावे लागू शकते , कारण बंडखोर गटातील अनेक चेहरे ना आ. संदीप क्षीरसागर यांच्या पचनी पडणारे आहेत ना डॉ . योगेश क्षीरसागरांच्या . मग या बंडखोरांना वगळून राजकारण करण्याची भूमिका दोन्ही क्षीरसागरानी घेतली तर या बंडातून बंडखोरांच्या पदरात काय पडणार हा मात्र प्रश्न राहणार आहे.
गटनेते बंडखोरांमध्ये असले तरी...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात गटनेत्यांना मोठे महत्व असते. सभागृहात आपल्या गटातील सदस्यांना व्हीप काढण्याचा अधिकार गटनेत्यांकडे असल्याने जिकडे गटनेता तिकडे पारडे जड मानले जाते. आज सत्ताधारी आघाडीचे गटनेते बंडखोर गटात आहेत. त्यामुळे बंडखोर गट शक्तिशाली वाटत असला तरी सत्ताधारी आघाडीच्या घटनेतील एका कलमाने गटनेत्याचे हात देखील बांधले गेलेले असल्याची माहिती असून गटनेत्यांनी आघाडीच्या नेत्याकडून विशिष्ट मोबाईल क्रमांकावरून आलेल्या सूचना किंवा निर्देशाप्रमाणेच व्हीप काढण्याचे बंधन त्या घटनेत आहे. त्यामुळे बंडखोर गटाला सभागृहातील राजकारण तितकेसे सोपे राहणार नसल्याची देखील परिस्थिती आहे.

