केज दि.२४(प्रतिनिधी):शहरातील गजबजलेल्या सराफा लाईन परिसरात ग्राहक बनून दुकानात शिरलेल्या तीन अज्ञात बुरखाधारी महिलांनी ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ४ गंठण असलेला संपूर्ण बॉक्स सुवर्णकाराची नजर चुकवून अत्यंत शिताफीने लंपास केला.असून, याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज येथील उमरी रोडवर राहणारे सुवर्णकार प्रदीप विजयकुमार रुद्रवार यांचे सराफा लाईनमध्ये दुकान आहे. १ जुलै २०२६ रोजी दुपारी दीड ते तीनच्या सुमारास तीन बुरखाधारी महिला सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आल्या. त्यांनी वेगवेगळे दागिने पाहण्याचा बनाव केला. याच दरम्यान सुवर्णकाराची नजर चुकवून त्यांनी दुकानातील काउंटरवर ठेवलेला ४७ ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या गंठणचा बॉक्स चोरून नेला. आजच्या प्रति ग्रॅम १२ हजार ७६५ रुपये दराने या चोरी झालेल्या दागिन्यांची एकूण किंमत ५ लाख ९९ हजार ९५५ रुपये आहे. ही चोरी इतक्या शिताफीने करण्यात आली होती की घटनेच्या वेळी दुकानदाराच्या ही गोष्ट अजिबात लक्षात आली नाही. १५ जुलै रोजी दुकानातील शिल्लक राहिलेल्या दागिन्यांच्या नियमित स्टॉकचे मोजमाप करत असताना ४ सोन्याचे गंठण कमी भरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दुकानदाराने संशय येऊन मागील सर्व दिवसांचे तारीखनिहाय सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. १ जुलैचे फुटेज पाहताना दुपारी आलेल्या तीन बुरखाधारी महिलांनी तो सोन्याचा बॉक्स हळूच उचलून आपल्याजवळ लपवल्याचे स्पष्ट दिसले. रुद्रवार यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी मंगळवार (दि.२१) रोजी रात्री ८ वाजता अज्ञात तीन बुरखाधारी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास केज पोलीस करत आहे.

बातमी शेअर करा
