Advertisement

शेरी बुद्रुक येथे भरदिवसा घरफोडी 

प्रजापत्र | Saturday, 18/07/2026
बातमी शेअर करा

  आष्टी दि.१८(प्रतिनिधी): तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील गोरे वस्तीवर ऐन दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाची हजेरी असताना, एका बंद घराचे कुलूप लोखंडी कटावणीने तोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, घरफोडी करून पळ काढताना एक चोरटा हातात लोखंडी हत्यार घेऊन धावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
   शेरी बुद्रुक येथील गोरे वस्तीवरील रहिवासी बाळासाहेब दशरथ गोरे हे शुक्रवार (दि.१७) रोजी दुपारी आपल्या कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. नेमकी याच संधीची वाट पाहत असलेल्या तीन अज्ञात सराईत चोरट्यांनी दुपारी ३:०० ते साडेतीनच्या सुमारास मुसळधार पावसात घराचा मुख्य दरवाजा तोडला. चोरट्यांनी थेट कपाटावर डल्ला मारत त्यामधील २ तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. एवढेच नव्हे तर, घरात ठेवलेले भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारे जर्मनी टेक्नॉलॉजीचे सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे मौल्यवान तांत्रिक यंत्र देखील चोरट्यांनी लंपास केले.चोरी केल्यानंतर हे भामटे दुचाकीवरून घाईगडबडीत पसार झाले. दरम्यान, घरफोडी करताना परिसरातील एका दुकानाच्या आणि घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एका चोरट्याची हालचाल टिपली गेली आहे. त्याने लाल रंगाचा शर्ट परिधान केला असून त्याच्या हातात घर फोडण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी कटावणी स्पष्टपणे दिसून येत आहे. चोरीचा हा ऐवज पाठीवर घेऊन हे तिन्ही आरोपी नगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील शेरी फाट्यावरून मिरजगावच्या दिशेने अत्यंत वेगाने दुचाकीवरून पळून जात असल्याचे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.

Advertisement

Advertisement