मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी विशेष मोहीम राबवली आहे. मुंबईतील अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल्स, बेकरी आणि क्लब्सचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्यभरात ३१ ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तपासणी मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर अनियमितता उघडकीस आल्या. अस्वच्छ वातावरण, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा, चुकीची माहिती असलेले लेबल, झुरळे व उंदरांचा वावर, शीतसाखळीचे नियम न पाळणे तसेच आवश्यक परवाने व कागदपत्रांचा अभाव अशा अनेक त्रुटी आढळल्याने संबंधित सहा आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.
नरीमन पॉइंट येथील फ्लिंट अँड वार्सा या उपाहारगृहात चुकीच्या माहितीचे लेबल लावलेले अन्नपदार्थ आढळून आले. तसेच तपासणीत सापडलेले मुदतबाह्य अन्नपदार्थ तत्काळ नष्ट करण्यात आले. बोरिवलीतील एका बेकरीत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय भांडुप, सांताक्रूझ, अंधेरी आणि वांद्रे येथील काही आस्थापनांमध्ये स्वच्छतेचा अभाव, कीटक नियंत्रणातील निष्काळजीपणा, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच ग्राहक तक्रार निवारण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

