अंबाजोगाई दि.२७(प्रतिनिधी): जागा मिळवण्याच्या घाईत धावत्या एसटी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न एका प्रवाशाच्या जीवावर बेतल्याची घटना (दि.२६) रोजी दुपारी अंबाजोगाई बसस्थानकात घडली. बससोबत धावत असताना तोल जाऊन बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने संबंधित प्रवाशाचा चिरडून मृत्यु झाला. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बस्स्थ्यनाकात फलाटावर येत असलेल्या एसटी बसमध्ये आधी जागा मिळावी, यासाठी संबंधित प्रवासी बससोबत धावत होता. मात्र, अचानक त्याचा तोल गेल्याने तो थेट बसच्या मागील चाकाखाली आला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला.घटनेनंतर उपस्थित नागरिक आणि प्रशासनाने तत्काळ मदतकार्य करत जखमी प्रवाशाला स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच धावत्या वाहनात चढण्याचे किंवा जागेसाठी जीव धोक्यात घालण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
