Advertisement

सोमवारपासून सुरु होणार कारागृहातील बंदी भेटी

प्रजापत्र | Friday, 12/02/2021
बातमी शेअर करा

 बीड : कोरोनामुळे सुमराई १० महिने बंद असलेल्या कारागृहातील बंदी भेटी आता सुरु होणार आहेत. सोमवार (दि,१५ ) पासून कोरोना नियमांचे पालन करत बंदी भेटी सुरु करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाने सर्व कारागृहांना दिले आहेत.
राज्यातील कारागृहांमध्ये बंद असलेल्या बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता यावे यासाठी बंदी भेटीची व्यवस्था असते. विशिष्ट कालावधी नंतर नातेवाईक बंद्यांना भेटू शकतात. मात्र राज्यात कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाल्यांनतर या बंदी भेटी स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मार्च पासून कारागृहातील बंद्यांची त्यांच्या नातेवाईकांशी भेट होऊ श्जकलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता कारागृह प्रशासनाने पुन्हा बंदी भेटी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवारपासून (दि. १५ ) या बंदी भेटी सुरु होणार आहेत.

बीडचे तात्पुरते कारागृह बंद होणार
कोरोना काळात बीड जिल्हा कारागृहामार्फत समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात तात्पुरते कारागृह सुरु करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या बंद्यांना क्वारंटाईन कालावधीसाठी या कारागृहात ठेवण्यात येत होते. मात्र आता कोरोनाचा  संसर्ग कमी झाला आहे, तर दुसरीकडे मुलींच्या वसतिगृहासाठी सदर इमारत रिकामी करून देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या कारागृहातून जिल्हा कारागृहात बंदी हलविण्याची प्रक्रिया सुरु असून तात्पुरते कारागृह बंद करून सदर इमारत सामाजिक न्या विभागाला हस्तांतरित केली जाणार असल्याचे बीडचे कारागृह अधीक्षक श्री. भोईटे यांनी म्हटले आहे.

 

Advertisement

Advertisement