वैराग : शेअर बाजारातील अफाट नफा कमावण्याच्या मोहापायी झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानीमुळे हत्तीज (ता. बार्शी) येथील एका सुशिक्षित आणि सुखी कुटुंबाचा एका रात्रीत भयानक अंत झाला आहे. बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. योगेश पाटील या मुख्याध्यापकाने आधी आपल्या पत्नी आणि ११ व ९ वर्षांच्या दोन निष्पाप चिमुकल्यांना विष दिले. त्यानंतर स्वतःही गळफास लावून मृत्यूला कवटाळले.
योगेश बाळासाहेब पाटील (वय ३९), पत्नी माधुरी योगेश पाटील (वय ३७), मोठा मुलगा अथर्व (वय ११) आणि लहान मुलगा शिवांश (वय ९) अशी या घटनेत मृत पावलेल्यांची नावे आहेत. योगेशने गुरुवारी मध्यरात्री पत्नी माधुरी, अथर्व आणि शिवांश यांना आईस्क्रीममधून विष दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिघांचा जीव गेल्यानंतर योगेशने स्वतः गळफास लावून आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरातून काही पुरावे गोळा केले आहेत.योगेशला शेअर बाजारात सुमारे १ कोटी ८१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या आर्थिक धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वैरागसह बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका सुशिक्षित कुटुंबाचा झालेला अंत दिवसभर चर्चेचा विषय ठरला. अधिक तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे करत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शाळेत कार्यरत
मूळचे हत्तीज (ता. बार्शी) येथील असलेले योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांना दोन सावत्र बहिणी असून, काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबात त्यांना आईचाच आधार होता. उन्हाळी सुट्ट्यांमुळे ते सध्या मूळ गावी, हत्तीज येथे आईकडे आले होते.
आईची खंबीर साथ, तरीही टोकाचे पाऊल
मित्र आणि नातेवाइकांकडून योगेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात उसने पैसे घेतले होते. ते मानसिक तणावाखाली असल्याची जाणीव त्यांच्या आईला झाली होती. विशेष म्हणजे, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आईने लाखो रुपयांची आर्थिक मदतही केली होती. तसेच वारंवार धीर देत कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नकोस, असे सांगून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले.

