बीड दि .९(प्रतिनिधी): राज्यातील तसेच बीड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय समोर आला आहे. शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या आणि अद्याप शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना आता ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक शिक्षकांवरील नोकरीची अनिश्चितता दूर झाली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचेही संरक्षण होणार आहे. या निर्णयानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शिक्षकांना टीईटी पात्रता प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे.
मात्र सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांना या अटीतून सूट देण्यात आली आहे. उर्वरित सर्व शिक्षकांनी निर्धारित मुदतीत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. यापूर्वी १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार टीईटी पात्रता मिळविण्यासाठी मर्यादित कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर विविध स्तरांवर झालेल्या पुनर्विचार याचिका आणि शिक्षक संघटनांच्या मागण्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षकांना आवश्यक पात्रता मिळविण्यासाठी आणखी तीन वर्षांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे ही मुदतवाढ केवळ एकदाच देण्यात आली असून त्यानंतर कोणतीही अतिरिक्त सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांनी या कालावधीचा प्रभावी वापर करून टीईटी पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. शिक्षकांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी राज्य सरकार आणि संबंधित परीक्षा यंत्रणांनी वर्षातून किमान दोन वेळा टीईटी परीक्षा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमित परीक्षा झाल्यास पात्रता मिळविण्याची संधी अधिक व्यापक होणार असून शिक्षकांनाही नियोजनबद्ध तयारी करता येणार आहे. बीड जिल्ह्यात सध्या सुमारे १२ हजारांहून अधिक शिक्षक विविध शाळांमध्ये कार्यरत असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने शिक्षकांनी अद्याप टीईटी पात्रता मिळवलेली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक लाभ जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना होणार असून त्यांच्या सेवेला स्थैर्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, या निर्णयामुळे एकीकडे शिक्षकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पात्र शिक्षकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी मुदतवाढ ही अंतिम संधी समजून टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

