Advertisement

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सचा अपघात

प्रजापत्र | Saturday, 06/06/2026
बातमी शेअर करा

आष्टी दि.६(प्रतिनिधी ): पुण्यावरून बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गाने नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचा अचानक स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने प्रवाशांनी भरलेली ही ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने प्रवाशांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्दैवी घटना घडली नाही आणि बसमधील सर्व ३० प्रवासी पूर्णपणे सुखरूप बाहेर पडले आहेत. हा थरार बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील कानिफनाथ घाटात शनिवार, ६ जून रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातानंतर काही वेळातच सर्व प्रवाशांना दुसऱ्या एका खाजगी बसची व्यवस्था करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा येथील 'नूर ट्रॅव्हल्स' (क्रमांक एमएच २९ एम ८३९७) ही खाजगी बस ३० प्रवाशांना घेऊन पुण्यावरून नांदेडकडे निघाली होती. पहाटे चारच्या सुमारास ही बस आष्टी तालुक्यातील कानिफनाथ घाटातून जात असताना, अचानक एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटला. बस भरधाव वेगात असल्याने चालक सतीश दराडे याला वाहन नियंत्रित करता आले नाही आणि ट्रॅव्हल्स थेट रस्त्यावरच पलटी झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आणि एकच किंकाळ्या ऐकू आल्या. मात्र, तातडीने मदत मिळाल्याने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, सुखदेव बांगर आणि चालक पडवळ यांनी तातडीने पोलीस ताफ्यासह अपघातस्थळी धाव घेतली.

 
 

 

Advertisement

Advertisement