मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केरळमध्ये अखेर गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले. हवामान विभागाने याबाबत गुरुवारी अधिकृत माहिती दिली. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. याबाबतही हवामान विभागाने माहिती दिली. दरम्यान, पुढील तीन – चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागा ‘ऑरेंज’, तर बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह, वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवसात मान्सूनचे आगमन राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर होण्याचा अंदाज आहे.
राज्यात मान्सूनचे आगमन कधी होणार ?
पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे संपूर्ण गोव्यासह राज्याच्या काही भागात दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी २४ मे रोजी केरळ येथे दाखल झालेला मान्सून राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ मे रोजी दाखल झाला होता, तर २६ मे रोजी मान्सूनचे आगमन मुंबईत झाले होते. यंदा मान्सून सरासरी वेळेच्या तीन दिवस उशिराने केरळ येथे दाखल झाला आहे.
राज्यात सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची स्थिती आहे. तर काही भागात गारपिटीची नोंद होत आहे. कोकण प्रदेशातील काही भागातही मान्सून पूर्व सरी बरसत आहेत. वादळी पावसामुळे तीव्र उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात शुक्रवारीही वादळी पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’ कुठे ?
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि सातारा घाट विभाग, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागने शुक्रवारी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तर अमरावती. वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर, ठाणे, धुळे , परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागातही हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

