पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ढवळून निघाले आहे. तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर पक्षाला एकामागोमाग हादरे बसत आहेत. भाजपाने टीएमसीचा दारुण पराभव करत त्यांना सत्तेबाहेर काढल्यानंतर आता पक्षाला अंतर्गत आव्हानांचाही सामना करावा लागत आहे.तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर आमदारांनी ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली. त्यातच खरा तृणमूल काँग्रेस पक्षाचीही चर्चा छेडली जात आहे. या सर्व घडामोडी पाहता,महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडी इतक्या गंभीर वळणावर पोहोचल्या आहेत की, खुद्द ममता बॅनर्जी यांनी पक्षाला कमकुवत करण्याचे आणि नष्ट करण्याचा संघटित प्रयत्न केला जात असल्याचे विधान केले आहे. महाराष्ट्रात ज्याप्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तसाच प्रयत्न तृणमूल काँग्रेसबरोबर केला जाऊ शकतो, अशा अफवा समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी हे विधान केले.तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी विरोधी पक्षनेता बदलण्यात यावा, यासाठी पत्र दिल्याचेही सांगितले जात आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये काय चालले आहे?
टीएमसीमधून काही आमदारांना बडतर्फ केल्यानंतर पक्षात बंडखोरीला उधाण आल्याचे सांगितले जाते आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले दोन आमदार इतर आमदारांच्या संपर्कात आहेत. कोलकातामधील राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चेनुसार, बंडखोर आमदारांच्या निवासस्थानी काही कथित बैठका झाल्या. ज्यामध्ये पक्षाचे भवितव्य आणि संघटनेतील नेतृत्व बदलावर चर्चा करण्यात आली.तृणमूल काँग्रेसने आमदार संदीपान साहा आणि ऋतब्रता बॅनर्जी यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवून पक्षातून बडतर्फ केले. त्यानंतर पक्षात तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. विधिमंडळातील नियुक्त्यांशी संबंधित स्वाक्षऱ्यांवरून निर्माण झालेल्या वादानंतर या दोन आमदारांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर पक्षात असंतोष वाढल्याचे बोलले जात आहे.
तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले प्रवक्ते रिजू दत्ता यांनी आरोप केल्यानंतर पक्ष फुटीच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली. रिजू दत्ता हे टीएमसीचे प्रमुख टीकाकार मानले जातात. पक्षाच्या धोरणावर यापूर्वीही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली होती. तृणमूल काँग्रेसच्या संघटनेत गंभीर अशा त्रुटी असल्याकडे दत्ता लक्ष वेधत आहेत.टीएमसीमध्ये संभाव्य फुटीसाठी दबाव टाकणाऱ्या गटाच्या संपर्कात १५ ते २० आमदार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बैठकीला आमदारांची दांडी
पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. शनिवारी (३० मे) पक्षाचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अंडी, दगड फेकण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही त्यांच्याच मतदारसंघात हल्ला झाल्याची घटना घडली.या दोन्ही घटनेनंतर ३१ मे रोजी पक्षाने आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला पक्षाच्या ८० आमदारांपैकी केवळ २० आमदार उपस्थित होते. ६० आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी होणारी बैठक अखेर रद्द करण्यात आली.
महाराष्ट्राशी तुलना का?
महाराष्ट्रामध्ये २०२२ साली शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा गट अधिकृत शिवसेना असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व झुगारून लावल्यानंतर अनेक आमदार आणि खासदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा मिळाला. त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत पक्ष असल्याचे जाहीर केले.
याचप्रकारे २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होत, स्वतःचा वेगळा गट निर्माण केला. यालाही पुढे निवडणूक आयोगाने मान्यता दिली. महाराष्ट्रातील या दोन्ही घटनांमध्ये सुरुवातीला बंडखोरांनी याची कुठलीही वाच्यता जाहीरपणे केली नव्हती. बंद दाराआड झालेल्या बैठकातून यावर चर्चा झाली. नेतृत्वाशी नाराजी असलेल्या नेत्यांना एकत्र केले गेले आणि त्यानंतर स्वतःचा गट अधिकृत असल्याचा दावा करण्यात आला होता.सध्या पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसबाबत हाच फॉर्म्युला वापरला जाणार का? याची जोरदार चर्चा होत आहे. विशेष करून जेव्हा विधानसभेला झालेला दारुण पराभव आणि पक्ष संघटनेतच निर्माण झालेल्या दोन प्रभाव केंद्रामुळे उलटसुलट चर्चा होत आहेत.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
राजकीय वर्तुळात होत असलेल्या या चर्चांना ममता बॅनर्जी यांनी पूर्णपणे फेटाळून लावलेले नाही. पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करत असताना त्यांनी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मान्य केले. पक्षाला नष्ट करण्याचा प्रयत्न होत असून आम्ही याविरोधात आंदोलन पुकारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तसेच बंडखोरांना सज्जड इशारा देत असताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही परिस्थितीत पक्षाची विचारधारा आणि पक्ष शिस्तीत तडजोड केली जाणार नाही. बंडखोर नेत्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, पक्ष संघटना ‘त्यांच्याशिवाय’ चालू शकते. पक्षाची खरी ताकद हे काही निवडक नेते नसून तळागाळातील कार्यकर्ते आहेत, असेही त्या म्हणाल्या.

