जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या ३० मे पासून आंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सरकारला गेल्या १० महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही, असं जरांगे यांनी म्हटलं. उन्हात आमरण उपोषणाला बसणार असून मेलो तरी चालेल, असं मनोज जरांगे म्हणाले. मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला १० महिने वेळ दिल्याचं सांगितलं. माझा नाईलाज आहे,मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकराला, समाजाला मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. मी सीमारेषेवर आलेलो आहे, ३० मे चं आमरण उपोषण ठरवलं आहे, त्यात बदल केला आहे. आमरण उपोषण सावलीत, मंडपात, फॅनमध्ये आपण ते करत होतो, सगळे तसेच करतात. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे, रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार, असं मनोज जरांगे म्हणाले.
माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत, या जीवाला तरसाचं किती दिवस, जे काही होईल ते होईल, उष्माघाताचा बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर आपण आपली कदर का करायची, असं मनोज जरांगे म्हणाले.
आमरण उपोषण कुठेही होईल, जंगलात होईल, रानात होईल, कडक उन्हात ते उपोषण होईल यावर मी ठाम आहे. किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही हे ठरवलं आहे. सारखी सारखी उपोषणं करुन जीवाला वेदना होत आहेत. एकदा तुकडा पडूदेत, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा तुकडा पडेल. हे आंदोलन सुरु आहे त्याला तीन वर्ष झालेत. मे महिन्याच्या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा होतोय, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आमरण उपोषण फायनल झालं आहे, यात बदल होणार नाही. मराठा समाजानं अंतरवाली सराटीकडे येऊ नये, असंही मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे. देशात इतकं टोकाचं आमरण उपोषण झालं असेल असं वाटत नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं.
प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील येणार की नाही हे मला माहिती नाही. २९ ऑगस्ट पासून उद्या पर्यंत १० महिन्याचा वेळ दिला आहे. हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला त्यानुसार तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? व्हॅलिडिटी देणार आहात का? मराठ्यांची मतं पाहिजेत,मात्र, मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण दिलं जात नाही. ही दुटप्पी भूमिका आहे. तुम्हीच आमच्यावर हल्ले करायचे, आमच्यावर 307 चा गुन्हा दाखल केला जातो. राज्यातील गुन्हे मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलीस आमच्यावर हल्ले करणार त्यांच्यावर 120 ब लागून 307 दाखल करत नव्हता.सातारा गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितलेला, 10 महिने जीआर काढत नाहीत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

