Advertisement

 मेघगर्जनेसह धो-धो कोसळणार!

प्रजापत्र | Friday, 22/05/2026
बातमी शेअर करा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असल्याचे दिसून येत आहे. तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला असून नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अशातच आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

     हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असताना काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मेघगर्जनेसह पावसाच्या धारा कोसळणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.आज शुक्रवार (दि. २२) रोजी दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.राज्यात एकीकडे पावसाचे वातावरण तयार होत असताना काही भागात तीव्र उष्णतेची लाट पसरत आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पार गेले आहे. यामुळे हवामान विभागाने शुक्रवार (दि.२२) आणि शनिवार (दि.२३) दोन दिवस विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा 'रेड अलर्ट', तर उर्वरित जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे.

Advertisement

Advertisement