Advertisement

 बीड जिल्हा बँकेच्या मागे इडी चा ससेमिरा  

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

 बीड-बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने वाटप केलेल्या कर्ज प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत चौकशी सुरु असतानाच आता यातील सुमारे ९० प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनेही चौकशी सुरु केली आहे. ईडीने यासंदर्भात बँकेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या असून यातील एका पदाधिकाऱ्याचा जवाबही नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेच्या मागे आता थेट ईडीचाच ससेमिरा लागल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लेखा परिक्षकांच्या अहवालानंतर २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील अनेक संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते. यातील अनेक गुन्हयांमध्ये जिल्हा बँकेचे कर्ज मंजूर करणारे तत्कालीन पदाधिकारी आरोपी आहेत. यातील एका प्रकरणात काही संचालकांना सत्र न्यायालयाने शिक्षाही दिली आहे.आता या १२९ पैकी सुमारे ९० प्रकरणात 'ईडी' ने स्वारस्य दाखविल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्ट २००२ मधील तरतुदीप्रमाणे आता ही चौकशी चालू झालेली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयानेया संदर्भात जिल्हा बँकेला नोटीस जारी केली असून वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागून घेतली आहे. यातील काही माहिती ईडीला पोहचली  असल्याचे बँकेच्या कथित गैरव्यवहारांचा पाठपुरावा करणारे अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

 

दोन वर्षापेक्षा अगोदरपासून आहे ईडीची नजर
बीड जिल्हा बँकेशी संबंधित गैरव्यवहारांवर 'ईडी'ची आज नव्हे तर २०१८ पासून नजर असल्याची माहिती समोर येत आहे. २०१८ मध्ये 'ईडी'ने जिल्हा बँकेला पत्र देऊन बेकायदा कर्ज वाटप प्रकरणाची माहिती मागविली होती. मात्र बँकेने या पत्राला भिक घातली नाही. त्यानंतर 'ईडी'कडून दोन वेळा बँकेला स्मरणपत्रे आली आणि अखरेस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वारंट बजाविण्यात आले. त्यानंतर जिल्हा बँकेने 'ईडी'ला अपेक्षित माहिती दिली आणि या माहितीची छानणी केल्यानंतर 'ईडी'ने या प्रकरणात स्वारस्य दाखविले आहे.

 

'ईडी'ने काय घेतली माहिती?
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीने एसआयटीकडे असलेले तब्बल १२९ एफआयआर, हे एफआयआर ज्या लेखापरिक्षणाच्या आधारे दाखल झाले ते कांकिया अँड मेहता यांचे लेखापरिक्षण अहवाल, विशेष लेखा परिक्षकांनी ८९(अ) खाली केलेल्या लेखापरिक्षणाचे अहवाल, नाबार्डचे अहवाल आणि ज्या संस्थांवर गुन्हे दाखल झाले त्या संस्थांना कर्ज वाटप करतानाचे संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती घेतली आहे.

 

एका माजी पदाधाकाऱ्याचा जवाब नोंदविला
जिल्हा बँकेकडून माहिती घेतल्यानंतर आता 'इडी'ने चौकशीचे सूत्रे हलवायला सुरुवात केली आहे. मागील आठवडयात जिल्हा बँकेच्या एका माजी पदाधिकाऱ्याचा जवाब नागपूर कार्यालयात नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. इतरही काही पदाधिकाऱ्यांना नोटीस काढण्यात आल्या आहेत.

 

 कोण आहेत रडारवर
बीड जिल्हा बँकेतील २००४-२०१२ या कालावधातील अध्यक्ष व संचालक, त्या काळातील मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्या संस्थांवर गुन्हे दाखल झाले त्या गुन्हयांमध्ये आरोपी करण्यात आलेले बँकेचे त्या त्या काळातील पदाधिकारी आणि त्या संस्थांचे पदाधिकारी 'ईडी'च्या रडारवर असल्याची माहिती आहे.

 

Advertisement

Advertisement