आष्टी दि.१८(प्रतिनिधी): मध्य प्रदेशातील भोपाळ येथे कार्यरत असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान विष्णू पोपट शेळके रविवारी दुपारी सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार होते. त्यासाठी त्यांची घरात आवराआवर सुरू होती. मात्र, देशसेवेसाठी निघण्यापूर्वी थोडा वेळ मित्रांना भेटून परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. भरधाव छोटा हत्ती टेम्पोने दिलेल्या जोराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
रविवार, १७ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा येथील संतोषी माता चौकाजवळ हा अपघात घडला. विष्णू शेळके हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 23 AP 4795) महामार्गावरील डिव्हायडरवरून वळण घेत असताना, जामखेडवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव छोटा हत्ती टेम्पोने (क्रमांक MH 12 SX 8433) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज, १८ मे रोजी सोमवारी सकाळी धानोरा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि सीआरपीएफच्या पुणे येथील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आपल्या शूर सहकाऱ्याला अखेरची सलामी दिली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

