बीड दि.१० (प्रतिनिधी)-कोरोनाच्या संकटातून आता कुठे बाहेर पडण्यास सुरुवात झाली असताना महागाईचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत.पेट्रोल आणि डिझेलने दरांमध्ये उच्चांकी पातळी गाठली असताना गॅस सिलेंडर ही २५ रुपयांनी महागला.ही कमी की काय आता दुधाचे दर ही वाढणार असल्याचे चित्र आहे.सध्या पेंडीचे दर क्विंटलमागे ८०० रुपयांनी वाढले असल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली की,मागील आठवड्यात सरकीपेंडीच्या दरात क्विंटलमागे ८०० रुपयांपेक्षा जास्त भाव वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला. दुभत्या जनावरांना सरकीपेंड खायला दिली की दूध उत्पादनात वाढ होते. त्यामुळे चाऱ्यासोबत सरकीपेंड दुभत्या जनावरांना देतात.यावर्षी चांगला पाऊस पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली होती.परंतु उन्हाळा सुरु होताच चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.यावेळी थंडीचे प्रमाण कमी जाणवले.शेवटच्या टप्यात पुन्हा थंडी वाढली असली तरी दिवसा उन्हाचे चटके काहीसे बसू लागले आहेत.शेतकऱ्यांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला असून सरकीपेंडकडे कल वाढू लागला आहे.दरम्यान वाढती मागणी पाहता सरकी २००० ते २१०० वरून थेट २९०० ते ३००० च्या घरात गेली.त्यामुळे आता वाढते दर पाहता दुधाच्या महागाईचे चटके सर्वसामान्यांना बसणार हे निश्चित झाले आहे.
खाद्य तेलांचे दर पुन्हा वाढले
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर खाद्य तेलांचे भाव नियंत्रणात राहतील,अशी सर्वसामान्यांची अपेक्षा बजेटनंतर फोल ठरली.खाद्य तेलांच्या दरात किरकोळ घसरणीनंतर पुन्हा उसळी मारल्याने सर्वसामान्यांसाठी फोडणी महाग बनली आहे.एक लिटर सूर्यफूल तेल १३५ वरून ५ रुपयांनी घटले व पुन्हा १० रुपयांनी वाढले.सोयाबिन तेल ही १२५ वरून ७ रुपयांनी कमी झाले व नंतर १२ रुपयांनी महाग.शेंगदाण्याच्या तेलातही १० रुपयांची वाढ झाली आहे.
कांदा ५० रुपयांवर;लाल कांदा अंतिम टप्यात आल्याने बाजारात तुटवडा
बीड-हळवी कांद्याचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्यात आल्याने बाजारात या कांद्याची आवक कमी झाली.परिणामी १० रुपये किलोवरून कांदा थेट ५० रुपयांच्या घरात गेला.पुढील एक महिना कांद्याचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.सध्या हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्यात असून गरवी (उन्हाळी कांदा) कांद्याचा हंगाम सुरु झाला आहे.मात्र बाजारपेठत आवक अल्प प्रमाणात असल्याने गेल्या आठवडाभरपासून कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे १० ते २० रुपयांवरून कांदा थेट ५० रुपयांच्या घरात गेला.वाढती मागणी पाहता कांद्याचे दर येत्या १५ दिवसांत ८० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.ही दरवाढ आगमी महिनाभर सुरु राहिल असा अंदाज आहे.