आष्टी दि.५(प्रतिनिधी) : शेतात नांगरणी करत असलेल्या दोन शेतकऱ्यांवर जुन्या वादाचा राग धरून लाकडी दांड्याने आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हिवरा शिवारात रविवार (दि.३)रोजी घडली असून या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा उजवा डोळा कायमचा निकामी झाला असून दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव दिलीप शेळके (वय ३०), राहणार धानोरा, तालुका आष्टी यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे वडील दिलीप शेळके आणि मामा नवनाथ तुकाराम घोडके हे ३ मे रोजी संध्याकाळी हिवरा येथील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत होते. त्यावेळी आरोपी संतोष भाऊसाहेब लवांडे, रोहित संतोष लवांडे दोन्ही राहणार हिवरा, तालुका आष्टी आणि अशोक रामदास महाजन रा. गांगर्डानिमगाव, तालुका कर्जत हे बेकायदेशीररीत्या तिथे आले.आरोपींच्या नातेवाईक मुलीला पळवून नेल्याच्या एक वर्षापूर्वीच्या रागातून हा हल्ला करण्यात आला. आरोपींनी लाकडी दांडके आणि कुऱ्हाडीच्या तुंब्याने दिलीप शेळके आणि नवनाथ घोडके यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दिलीप शेळके यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचे दृष्टीपटल निकामी झाले असून पायही फॅक्चर झाला आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सोमवार (दि.४) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि श्री.भडके करत आहेत.

