Advertisement

शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम

प्रजापत्र | Wednesday, 22/04/2026
बातमी शेअर करा

 मुंबई : राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले. त्यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

    या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद झाला आहे. प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयाने स्वीकारला होता. त्यामुळे, या गुन्ह्याच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी दाखल केलेले प्रकरण कायम राहू शकत नाही, असा दावा करून रोहित यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. आपल्याविरुद्ध ईडीने केलेले आरोप हे खोटे असून आपल्याविरुद्ध खटला दाखल केला जाऊ शकत नाही, असा दावाही रोहित यांनी अर्जात केला होता.

रोहित यांच्याव्यतिरिक्त, त्यांचे जवळचे सहकारी आणि व्यावसायिक राजेंद्र इंगवले आणि इतर पाच जणांनीही दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तर रोहित यांच्या अर्जावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्याची विनंती ईडीने विशेष न्यायालयाकडे केली होती. खासदार आणि आमदारांच्या प्रकरणांसाठी स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी रोहित पवार आणि अन्य आरोपींचा अर्ज मंजूर करून त्यांना प्रकरणातून दोषमुक्त केले.

Advertisement

Advertisement