छत्रपती संभाजीनगर : गोरं होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाकिस्तानी क्रीम्समुळे थेट किडनीवर परिणाम होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात बंदी असलेल्या या सौंदर्य प्रसाधनांची सर्रास विक्री होत असल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.सिटी चौक पोलिसांनी धाड टाकत तब्बल ६० हजार रुपयांची क्रीम्स, साबण आणि सिरम जप्त केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहागंज, घासमंडी आणि सिटी सेंटर मॉल परिसरातील दुकानांवर कारवाई केली. ‘हायलाईट कलेक्शन’, ‘ओम ट्रेडर्स’ आणि ‘फलक इम्पोरियम’ या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात माल जप्त करण्यात आला. एकूण ५९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.पोलिसांच्या या कारवाईत मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस ब्युटी क्रीम यांसह विविध पाकिस्तानी क्रीम्स जप्त करण्यात आल्या. तसंच पारले गोल्ड, गोरे साबण आणि मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम यांचाही समावेश आहे.या क्रीम्सचा वापर करणाऱ्या काही तरुण-तरुणींनी आरोग्य बिघडल्याचा दावा केला आहे. गोरं होण्याच्या नादात वापरलेल्या या क्रीम्समुळे त्वचेवरच नाही तर थेट किडनीवरही परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.गोरं होण्याच्या हव्यासापोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याशी खेळ करतायत का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अशा क्रीम्स वापरून कायमस्वरूपी गोरे होता येत नाही, उलट त्वचा आणि किडनी दोन्ही धोक्यात येतात.सरकारची बंदी आणि पोलिसांची कारवाई असूनही अशा उत्पादनांचा काळाबाजार सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

