Advertisement

जिल्ह्याचे नाव मातीत नेत्यांनी घातले का उठवळ माध्यमांनी?;राजीव खांडेकर यांना एक अनावृत्त पत्र

प्रजापत्र | Monday, 09/03/2026
बातमी शेअर करा

 प्रिय राजीवजी खांडेकर,
आपण बीडमध्ये येवून काहीही बोललात तरी आम्ही मात्र आपल्याला प्रिय हे संबोधन वापरूनच बोलणार,एकतर आपण जिल्ह्यात अतिथी म्हणून आलात आणि दुसरे म्हणजे आपण जिल्ह्याचे जावई,त्यामुळे आपल्याला इथे यायला नकोसे वाटले तरी आपण इथे आल्यावर आम्हाला आपण नकोसे वाटून कसे चालणार?
राजीवजी आपण पत्रकारितेतले ज्येष्ठ आहात,त्यामुळे आपण बोलत असलेल्या शब्दाचे परिणाम आपल्याला माहित असतीलच,तरीही आपण बीड जिल्ह्यात येऊन,इथला पाहुणचार घेवून पुन्हा बीड जिल्ह्यात यायला नको वाटते आणि इथल्या नेत्यांनी जिल्ह्याचे नाव मातीत घातले अस काही म्हणलात,हे म्हणताना आपल्या डोळ्यासमोर कोणते नाव होते माहित नाही,पण आपल्याला कदाचित बीड जिल्ह्याची नेत्यांची परंपरा जाणीवपूर्वक दुर्लक्षित करायची असावी (कारण ती परंपरा किंवा तो वारसा आपल्यासारख्या ज्येष्ठाला माहित नाही असे कसे म्हणणार?)
राजीवजी, या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना खासदार केले होते,केशरकाकू क्षीरसागर यांच्यासारख्या करारी महिला याच जिल्ह्यातल्या,बबनराव ढाकणेंना देखील या जिल्ह्याने बळ दिले.गंगाधर बुरांडे यांच्यासारख्या कम्युनिस्ट विचारधारेच्या व्यक्तीला खासदार करणारा हा जिल्हा.दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा हा जिल्हा.सुंदरराव सोळंके,द्वारकादास मंत्री,बाबूराव आडसकर,विमलताई मुंदडा अशी किती नावे सांगायची? शिवाजीराव पंडित,जयदत्त क्षीरसागर, अशोक पाटील,रजनी पाटील,पंडितराव दौंड,माधवराव पवार हे सारे बीडचेच.सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये प्रचंड योगदान देणारे उषा दराडे,सुशीला मोराळे,बाबूराव पोटभरे अशी आक्रमक नावे आपल्याला माहित असतीलच.बीड जिल्ह्यात येवून जेव्हा आपण इथल्या नेत्यांबद्दल बोलत होतात ना त्याचवेळी आपल्यापासून जवळच शेतकरी कीर्तन महोत्सवाचा समारोप होत होता.शेतकऱ्यांसाठी झटणारे किसान सभेचे नेते कदाचित आपल्याला आठवत नसतीलही.
राजीवजी,सध्याचे लोकप्रतिनिधी मग ते प्रकाश सोळंके,सुरेश धस, धनंजय मुंडे,विजयसिंह पंडित,नमिता मुंदडा,संदीप क्षीरसागर,पंकजा मुंडे,बजरंग सोनवणे हे सारे जनतेतले चेहरे आहेत,जनतेत जाऊन लाखोंचे मतदान घेणारे आहेत,जनता पुन्हा-पुन्हा या नेत्यांवर विश्वास दाखवित आली आहे,जनतेचे अश्रू पुसायला हेच नेते असतात,मग यापैकी कोणी जिल्ह्याचे नाव मातीत घातले असे आपल्याला वाटत असेल तर आपण जिल्ह्यातल्या लाखो जनतेसोबत देखील प्रतारणा करत आहोत, त्या जनतेला बोल लावत आहोत असे वाटत नाही का?
मुळात नेता किंवा लोकप्रतिनिधी,कोणत्याही विचारधारेचा असो,त्या विचारधारेबद्दल,त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मतांतरे असू शकतील,मात्र कोणतेही नेतृत्व घडायला खूप खस्ता खाव्या लागतात आणि नेतृत्व जनता घडवित असते,त्यासाठी कायम जनतेत रहावे लागते.माध्यमांमधील नॅरेटिव्ह वरून नेते लोकप्रतिनिधी तयार होत नाहीत हे वास्तव मान्य करावेच लागेल,त्यामुळे नेत्यांनी जिल्ह्याचे नाव काळवंडले असले सरधोपट विधान आपणाकडून तरी अपेक्षित नव्हतेच.याच जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीत काही वर्षापूर्वी आपण पुरस्कार स्वीकारला होता याचाही कदाचित बोलण्याच्या ओघात आपल्याला विसर पडला असेल तर आम्ही काय बोलणार?
खरच सांगा, बीडची बदनामी करण्यात आणि बीडचे नाव मातीत घालण्यात नेत्यांचा वाटा किती आणि माध्यमांमधल्या उठवळ विकृतीचा वाटा किती? कोणत्या घटनेची शहानिशा करण्याचा प्रयत्न कधी माध्यम म्हणून आपण करतो का? कोणीही,काहीही आरोप केले की लगेच ते ब्रेकिंग करताना,त्याची किमान खातरजमा करण्याचा पत्रकारिता धर्म आम्ही आपणाला सांगावा का? त्याचे पालन होते का? न्यायालयात याचिका दाखल झाली किंवा कोणी आरोप केले की एखाद्याला दोषी,गुन्हेगार ठरवून मोकळे होण्याची मानसिकता माध्यमांमध्ये कोणी रुजविली? एका चॅनलने काही चालविले की लगेच ते खरे असो अथवा खोटे,त्या बाईटच्या किंवा गोष्टीच्या मागे आपल्या स्ट्रिंजरला पाठविणारे संपादक आमच्या जिल्ह्याचे नाव मातीत घालायला जबाबदार नाहीत का? आज आपण इथल्या नेत्यांबद्दल सरधोपट विधान केले,पण याच नेत्यांच्या मुलाखतीसाठी आपल्यासारखे अनेक जण काय काय करायचे हे जिल्ह्याला माहित नाही असे आपल्याला वाटते का? आपल्यात खरोखरच बाणेदारपणा असेल तर कोणत्या नेत्यामुळे जिल्ह्याचे नाव मातीत गेले हे जरा स्पष्टपणे बोलायला हवे होते,म्हणजे त्याच नेत्याबद्दल यापूर्वी आपल्याच माध्यमांनी किती स्तुतिसुमने गायली होती हे देखील स्पष्ट झाले असते आणि लोकांना तुलना तरी करता आली असती.
माध्यमांनी व्यवस्थेतले दोष दाखवायचे असतात, पण सरधोपट बोलायचे नसते आणि न्यायाधीश तर व्हायचेच नसते.अशा बोलण्याने टाळ्या मिळतील,पण त्यातून पत्रकारिता धर्म टिकत नसतो.हे सगळे आपल्याला सांगण्याचा हेतू म्हणजे आपली नेतृत्व आपणच सांभाळायची असतात.कोणताच नेता कधी आपल्या भागाची बदनामी व्हावी यासाठी काम करत नसतो आणि आपणच आपले लोकप्रतिनिधी बदनाम केले तर प्रशासकीय आणि इतर व्यवस्था किती मुजोर होतात हे सध्या बीड जिल्हा अनुभवतोय.आपण आज कोणा एकाच्या संदर्भाने बोललात म्हणून इतरांना काही काळ गुदगुल्या होतीलही,पण आरोपांची राळ कधीही कोणावरही उडू शकते.निव्वळ आरोपांवरून कोणत्याही नेत्याबद्दल असे काही बोलणे किमान आपल्यासारख्या थोरांकडून अपेक्षित नाही.आपण अतिथी आहात,जोडीला जमत आहात,अतिथीने देखील आपल्या मर्यादा पाळायच्या असतात आणि कोणत्या मातीला बोल लावायचा नसतो,यातून जिल्ह्याच्या नव्हे तर आपल्या नावावर परिणाम होतोच. शेवटी ‘जामातो दशम ग्रह:‘ असे समजण्याची वेळ आमच्या जिल्ह्यावर आपण येवू देऊ नये इतकेच.
आपलाच
एक सामान्य बीडकर

Advertisement

Advertisement