Advertisement

अवकाळीने गारपीटीसह झोडपलं

प्रजापत्र | Tuesday, 24/02/2026
बातमी शेअर करा

मुंबई :राज्यात गेल्या चार दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. सोमवारी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार तडाखा दिला. तर भंडारा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यवतमाळ, नांदेडमध्ये गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.

      हवामान बदलाचा कोकणात काजू आणि आंबा पिकाला आधीच फटका बसलाय. मोहोर करपल्यानं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं पुन्हा मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होतेय. रत्नागिरीत रविवारी तर सिंधुदुर्गमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भातही अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं. यामुळे हरभरा पिकाचं नुकसान झालंय.

 

हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच वातावरणात अचानक बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यावर अवकाळी पावसाचं सकंट आहे. हवामान विभागाकडून येत्या २४ तासात राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी सोमवारी पावसाने हजेरी लावली. मंगळवारीही सातारा, सांगली कोल्हापूरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भात यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूरला वीजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

 

Advertisement

Advertisement