माजलगाव दि.१६(प्रतिनिधी): शहरातील मुख्य रस्त्यावर चव्हाण हॉस्पिटलसमोर रविवारी रात्री एक भीषण घटना घडली. गाडीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून शुभम रूपचंद कांबळे या तरुणाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या प्रकरणी जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली माजलगाव शहर पोलिसांनी पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शुभम कांबळे हा आपली स्कुटी घेऊन मुख्य रस्त्यावरून जात असताना रवी कुऱ्हाडे याने त्याच्या गाडीला कट मारला. शुभमने 'कट का मारला?' अशी विचारणा केली असता, रवीने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत गाडीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर रवी कुऱ्हाडे आणि लक्ष्मण शिंदे यांनी इतरांना जमवून शुभमला खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. शुभमने जिवाच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, विशाल, विलास आणि राहुल चव्हाण यांनी त्याला पकडून ठेवले. यावेळी रवी कुऱ्हाडे याने शुभमचा गळा दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर लक्ष्मण शिंदे याने त्याला अवघड जागेवर आणि छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुभमचे वडील रूपचंद कांबळे हे मुलाला वाचवण्यासाठी धावले असता, त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
पोलिसांची तातडीची कारवाई
या प्रकरणी शुभम आणि त्याचे वडील रूपचंद कांबळे यांच्या फिर्यादीवरून रवी कुऱ्हाडे, विशाल चव्हाण, विलास चव्हाण, राहुल चव्हाण आणि लक्ष्मण शिंदे (सर्व रा. वडारवाडा) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक अनिल कटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

